नाशिक : अंमळनेर येथे भाजपाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पक्षांतर्गत वादावादीत राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली. त्यामुळे नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठविला आहे. इतकेच नव्हे तर ‘लवकर बरे व्हा, पण नाशिकच्या सेवेत रूजू व्हा’असा उपरोधिक सल्ला दिला आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी वाटपावरून वाद सुरू आहेत. भाजपात अनेक पक्षांतील इच्छुक नेते येत असून, त्यात भाजपा फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे भाजपाच्या मेळाव्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यात हाणामारी झाली. त्याचवेळी राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली. अन्य पक्षात फोडाफोडी करण्याचे हे फळ असल्याचे यासंदर्भात बाम पाठविणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
विविध पक्षांशी संबंधित या युवकांनी नाशिककर म्हणून ही कृती केल्याचे सांगितले. महाजन यांना धक्काबुक्की झाली असल्याने त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी झेंडू बाम, फेड एक्स कुरिअरने पाठविण्यात आले आहे. यानंतर त्यांना बरे वाटत नसेल तर नाशिकमध्ये मोठी रुग्णालये असून, तेथे त्यांनी दाखल झाल्यास पेशंट म्हणून नाशिककर दत्तक घेतील असे उपरोधिकपणे विद्यासागर घुगे, सुशांत भालेराव, अजिंक्य गिते, शान घुगे, कुणाल भांडारे, कमलेश काळे, विकी बिराडे, वेदांत दाभाडे यांनी सांगितले.