सुरगाणा : रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाय... घेतल्याशिवाय जाणार नाय...या घोषणांसह डफावरील थाप, जागरण-गोंधळाची गाणी, तहसीलच्या आवारातच टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मांडलेली तीन दगडाची चूल, सोबत दावणीला आवारातच बांधलेला बोकड, पायाला दोरी बांधून ठेवलेलं कोंबडं असे अनोखे आंदोलन श्रमजीवी संघटनेच्यावतीने करण्यात आले.
रेशनकार्ड व ऑफलाइन धान्य मिळावे, या मागणीसाठी केलेली घोषणाबाजी हे श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या बिऱ्हाड मोर्चाचे दृश्य कार्यालयीन वेळेत अकरा वाजेपासून तहसील आवारात दिसून आले. लॉकडाऊन काळात सुरगाणा या आदिवासीबहुल तालुक्यातील गरीब कुटुंबांनी दाखल केलेल्या विभक्त व नवीन रेशन कार्डच्या १४५८ प्रकारणांपैकी केवळ ३९१ रेशन कार्ड मिळाले. तेदेखील ऑनलाइन झाले नाहीत. रेशन कार्ड न मिळाल्याने गरीब कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित रहावे लागत असल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबांना ऑफ लाइन धान्य व रेशनकार्ड द्यावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेतर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात बिऱ्हाड आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अध्यक्ष रामराव लोंढे, सरचटणीस भगवान मधे, तालुका अध्यक्ष राजू राऊत, सचिव दिनेश मिसाळ, पेठ - दिंडोरीचे अध्यक्ष मुरलीधर कनोजे, इगतपुरीचे संजय शिंदे आदि उपस्थित होते.
इन्फो
मुक्काम ठोकण्याची भूमिका
जोपर्यंत रेशनकार्ड मिळणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवून प्रसंगी तहसीलमध्येच मुक्काम ठोकण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात महिलांचादेखील सहभाग आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भवाडा, केळूणे, उंबरदे(मा), भरडमाळ, काठीपाडा, देवळा, सांबरखल, मुरुमदरी, वांजुळपाडा, गळवड, कुकूडमुंडा, गाळबारी आदि वाडी, पाडा, वस्तीवरील आदिवासी बांधव उपस्थित होते.
कोट....
संपूर्ण रेशनकार्ड व ऑफलाइन धान्य मिळत नाही, तोपर्यंत तहसील कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
- राजू राऊत, तालुका अध्यक्ष, श्रमजीवी संघटना.
फोटो - १० सुरगाणा आंदोलन
रेशनचे धान्य मिळावे, या मागणीसाठी सुरगाणा तहसील कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन.
===Photopath===
101220\10nsk_34_10122020_13.jpg
===Caption===
रेशनचे धान्य मिळावे या मागणीसाठी सुरगाणा तहसिल कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन.