लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पदनिहाय वेतनश्रेणी आणि सातवा वेतन आयोगासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर चड्डी-बनियान आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगारांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. गेल्या सोळा महिन्यांपासून कामगार संघटना सातव्या वेतन आयोगाची मागणी करीत असून प्रशासनाकडून मात्र त्यास नकार दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर कामगार संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. दुपारी १ वाजता कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी चड्डी-बनियानवर विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडले. सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत प्रशासनाचा भूमिकेचा तीव्र निषेध केला. एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय पवार यांनी यावेळी प्रशासनाकडून आयोग लागू करण्यास होणाऱ्या विलंबामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले. संघटना कोणत्याही चर्चेला तयार असून, शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोग लागू करावा, अशी प्रमुख मागणी असल्याचे पवार म्हणाले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करीत घेतल्या शिवाय राहणार नाही, असा नारा दिला. संघटनेचे कार्यकर्ते चड्डी-बनियान आणि हातात फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विभागीय अध्यक्ष विजय पवार यांच्यासह स्वप्नील गडकरी, रमेश सूर्यवंशी, बाळू सोनवणे, सचिन पाटील, विनायक शिंदे, भरत खंबाईत आदिंसह संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्या सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, पदनिहाय वेतनश्रेणी, २५ टक्के अंतरिम वाढ, वाढीव महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, एकतर्फी प्रसारित केलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना कापडाचा पुरवठा करावा, चालक कम वाहक या पदांचा पुनर्विचार करण्यात यावा, प्रचलित शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीचा भंग करून काढलेली परिपत्रके रद्द करण्यात यावीत, चालक-वाहकांची नियमबाह्य कामवाढ पद्धत रद्द करण्यात यावी, लांब पल्ल्याच्या बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
कामगारांचे चड्डी-बनियान आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:42 AM