नाशिक : जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली असून, सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरू आहे. परंतु, मजुरांनी कोरोनाच्या संसर्गाची धास्ती घेतली असून, शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतीची कामे रेंगाळल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
कसमादे पट्ट्यासह लगतच्या तालुक्यांमध्ये सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु आहे. मात्र, कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, मजूरही शेतीकामाला येण्यास स्पष्ट नकार देत आहेत. कोरोनामुळे शेतमजुरांचाही वानवा निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. गेल्या चार महिन्यांपासून संगोपन केलेला उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे कांदा लवकरात लवकर काढणी करून साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे कांदा ओला होऊन खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे लवकरात लवकर कांदा काढून साठविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाला असून, कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये रुग्णवाढीचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे मजूरही शेतीकामाला येण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
कोट-१
दरवर्षी उन्हाळ कांद्याच्या हंगामात कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणी मजूर कांदा काढणीसाठी दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामे वेळीच पूर्ण होतात. पण कोरोनाच्या महामारीमुळे मजूरही धास्तावले आहेत. त्यात कोकणीसह इतर परप्रांतीय मजूर दाखल न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- साहेबराव निकम, शेतकरी
कोट-२
उन्हाळ कांदा लागवडीपासून पिकाला ग्रहणच लागले की काय? अशी स्थिती आहे. लागवडीपूर्वी बियाणांचा, रोपांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपांचेही नुकसान झालेय. पुन्हा हिंमत न हरता शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणून कांदा लागवड केली. यात काही ठिकाणी बोगस बियाणांचा फटका बसला तर काही ठिकाणी परतीच्या पावसाने व गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कांदा उत्पादकांवर मोठे संकट कोसळले होते. लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले असताना आता कोरोनामुळे शेतमजूर मिळत नाहीत. त्यामुळे अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.
- शंकरराव खालकर, शेतकरी