सुरगाणा : भाजपमध्ये चमच्यांचे टोळके कार्यरत असून, त्यांनी माझ्याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केलेली आहे. आता तिकीट मिळाले तरी घेणार नाही, असे सांगत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेले भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पालकमंत्र्यांवर शरसंधान केले.भाजपने खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून राष्टÑवादीतून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते. शुक्रवारी (दि.२९) मोतीबाग येथे आयोजित समर्थकांच्या मेळाव्यात चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली. यावेळी चव्हाण यांनी पालकमंत्र्यांविरुद्ध रोष व्यक्त करतानाच भाजपतील टोळक्यावरही हल्ला चढविला.चव्हाण म्हणाले, गेल्या निवडणुकीत भारती पवार या मोदींविरोधात बोलत होत्या. आता त्यांनाच पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याऐवजी नाशिकच्या महापौर रंजना भानसी अथवा पक्षातीलच अन्य कुणालाही उमेदवारी दिली असती तरी आपण त्याचे स्वागत केले असते; परंतु पक्षात काही जणांचे टोळके कार्यरत आहे, तेच चुकीची माहिती देत असतात. वाजपेयी सरकारच्या काळात विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करावे यासाठी मला करोडो रुपये मिळत होते; परंतु मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. मात्र, पार्टीने त्याची आठवण ठेवली नाही, असे सांगत चव्हाण यांनी आपल्या भूमिकेबाबत संदिग्धता कायम ठेवली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही पालक-मंत्र्यांविरुद्ध रोष व्यक्त केला.कोरड्या विहिरीत उडी मारू का?तुम्ही मला निवडणूक लढविण्यासाठी आग्रह करीत आहात; पण मी कोरड्या विहिरीत उडी मारायची का? लोकसभा ही काही छोटी निवडणूक नाही. राजकारणात काहीही अशक्य नसल्याचेही हरिश्चंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.गावितपुत्राची हजेरीचव्हाण समर्थकांच्या मेळाव्याला माकपाचे उमेदवार आणि आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले. यावेळी इंद्रजित गावित यांनी सांगितले, मी येथे पक्षाच्या वतीने नव्हे तर एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून आलो आहे. कोणी कोणाला मदत करायची हे मी सांगणार नाही; परंतु खासदार चव्हाण व आमदार गावित हे यावर चर्चा करू शकतात, असे सांगून बदलत्या समीकरणाचे संकेत दिले.
भाजपमध्ये चमच्यांचे टोळके कार्यरत : हरिश्चंद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:40 AM