गणेश धुरी : नाशिकदेश आणि राज्य कॅशलेसकडे वाटचाल करीत असताना आणि देशाच्या पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचा नारा दिलेला असताना, जिल्हा परिषदेच्या एका विभागाने त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. ग्रामपंचायत विभागाचा कारभार जास्तीत जास्त पेपरलेस होण्यासाठी विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती ई-मेलवर मागविण्यास सुरुवात केली आहे.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी विभागातील सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पवार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश थेटे यांच्यासह सर्व वीस सहकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती ई-मेलवर देण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशिष्ट प्रपत्रात त्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मागवून रत्नाकर पवार व प्रकाश थेटे यांचे वैयक्तिक ई-मेल वगळता अन्य १८ कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे ग्रामपंचायत विभागाचे ई-मेल तयार केले आहे. विशिष्ट प्रपत्रात कोणाकडे कोणते काम आहे, त्याने ते किती दिवसात करणे अपेक्षित आहे, कोणती नस्ती कोणाकडे प्रलंबित आहे, त्या नस्तीला विलंब का झाला, यासह सर्व बारीक सारीक तपशील या माहितीपत्रात असणार असल्याचे समजते. तसेच सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना द्यावयाची माहिती त्यांच्या मेलवर (संकेतस्थळावर) देणे अपेक्षित आहे. या सर्व ई-मेलवरील विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे संकलन करण्यासाठी एका स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. या कर्मचाऱ्याकडे एक लॅपटॉप देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विभागाने अन्य विभागांवर आघाडी घेत कारभार पेपरलेस करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत विभागाचे कामकाज पेपरलेसकडे
By admin | Published: December 22, 2016 12:58 AM