मालेगाव : पंतप्रधान आवास योजनेची माहिती देण्यासाठी येथील महापालिकेच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महापौर रशीद शेख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त संगिता धायगुडे, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, व्हीआयपी असोसिएटच्या प्रतिनिधी मेघा भवारी उपस्थित होत्या.यावेळी भवारी यांनी शासनाकडून सर्वांना घरे २०२२ या धोरणाची अमलबजावणी केली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यात झोपडपट्टी पुनर्वसन, कर्जसलग्न व्याज अनुदान, भागिदारी तत्वावर परवडणारी वैयक्तीक घरकुल अनुदान, झोपडपट्टी निर्मुलन आदिंचा समावेश असणार आहे. शहरात १३४ झोपडपट्ट्या आहेत. ३४ झोपडपट्ट्या शासनाने झोपडपट्ट्या म्हणून घोषित केल्या आहेत. इतर ९८ झोपडपट्ट्याही घोषित केल्या जातील. त्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे असे सांगितले. बैठकीला गटनेते, नगरसेवक, शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक उपस्थित होते.