नाशिक : इराणमधील तेहरानमध्ये १५ जुलैपासून होणाऱ्या २९व्या जागतिक बायोलॉजी आॅलिम्पियाडमध्ये भारतातर्फे निवडण्यात आलेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये नाशिकच्या विश्वेश भराडिया या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे.भारतीय विद्यार्थ्यांचा संघ या आॅलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. जगभरातील ६२ देशांमधून २५० विद्यार्थी या आॅलिम्पियाडमध्ये सहभागी होत आहेत. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘नीट’ या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेत विश्वेशने देशात ५१वा क्रमांक पटकवायला होता, तर ‘एम्स’च्या वतीने घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत त्याने देशात २२वा क्रमांक पटकावला आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडिया यांचा तो मुलगा असून, त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई बोर्डाच्या सिम्बॉयसिस शाळेतून, तर बारावीपर्यंतचे शिक्षण एसएससी बोर्डाच्या आरवायके महाविद्यालयातून घेतले आहे. भारतातील २० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातून ३०० विद्यार्थी निवडण्यात आले. त्यांची पुन्हा परीक्षा घेऊन ३५ विद्यार्थी निवडण्यात आले. या ३५ जणांचे १० दिवसीय शिबिर घेऊन त्यातून ३ जणांची अंतिम निवड करण्यात आली. विश्वेशच्या यशाच्या रूपाने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.वर्ल्ड बायोलॉजी आॅलिम्पियाड बायोलॉजीवर आधारित ही परीक्षा आहे. यात लेखी व प्रॅक्टिकल दोन्ही प्रकारची परीक्षा असते. बाकीच्या परीक्षा केवळ लेखीच असतात पण ही परीक्षा दोन्ही प्रकारे होते. मी नियमित अभ्यासावर भर दिला. परीक्षेच्या शेवटच्या महिन्यात अभ्यास वाढवला. प्रॅक्टीकलसाठी पुण्यातही गेलो होतो. याचे अनेक राऊंड होतात. त्यातून अंतिम यादी जाहीर केली जाते. ही परीक्षा सोपी व सुंदर आहे. आनंददायी आहे.- विश्वेश भराडिया, विद्यार्थी
जागतिक बायोलॉजी आॅलिम्पियाड; नाशिकच्या विश्वेशची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:26 AM