नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १ ते ७ आॅगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात येत आहे.यंदा ‘यशस्वी स्तनपानासाठी पालकांचे सक्षमीकरण’ हे घोषवाक्य असून, त्याला अनुसरून जनजागृतीपर कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याविषयीची माहिती गरोदर माता व प्रसूती झालेल्या मातांना देण्यात येत आहे. बाळाच्या जीवनातले पहिले १००० दिवस (९ ते २४ महिने स्त्री गरोदर राहिल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतचा काळ) या काळामध्ये बाळाची वाढ आणि विकासाकरिता हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात स्तनपानासाठी व पोषणासाठी बाळ मातेवर अवलंबून असते यासाठी या काळात गरोदर माता व स्तनदा माता यांना त्यांच्या स्वत:च्या व बाळाच्या आहाराविषयी मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे असते म्हणून आरोग्य विभागातर्फे दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो.बाळाला स्तनपान करताना करावयाचा संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. याच दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बाळाच्या मेंदूचा विकास ७५ टक्के होत असतो. त्यामुळे विविध पातळीवरील आरोग्याशी निगडित असलेल्या संस्था वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग स्कूल स्तनपानाविषयी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे, तसेच निबंध स्पर्धा, प्रभात फेरीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे.गरोदर माता व स्तनदा माता व त्यांच्या घरातील व्यक्तींनी स्तनपानाचे महत्त्व जाणून घेऊन समाजामध्ये त्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. सैंदाणे, डॉ आनंद पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.(फोटो ०३ हेल्थ)
जागतिक स्तनपान सप्ताहास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:09 AM