नाशिक : येथील राजेश व प्रफुल्ल सावंत या चित्रकार बंधूंना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. तुर्की देशात आयोजित जागतिक स्पर्धेत प्रफुल्ल सावंत यांनी जगातील सर्वोत्कृष्ट चित्रकाराचे प्रथम क्रमांकाचे दोन लाख ६० हजारांचे पारितोषिक पटकावले, तर राजेश सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. तुर्कीतील इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी या संस्थेच्या जगातील ५५ देशांत शाखा आहेत. चित्रकलेतील सर्वांत अवघड प्रकार मानल्या जाणाऱ्या जलरंग या माध्यमाचा जगात प्रचार, प्रचार करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. तुर्की सरकार व इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्कीतील इझमीर राज्यातील बोर्नोवा या शहरात आंतरराष्ट्रीय ‘आॅन दी स्पॉट’ निसर्गचित्रण स्पर्धा, चित्रप्रदर्शन, वॉटरकलर फेस्टिव्हल या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, इटली, रशिया, जपानसह अनेक प्रमुख देशांचे कलावंत सहभागी झाले होते. या उपक्रमात सावंत बंधू तुर्की सरकारच्या आमंत्रणावरून सहभागी झाले होते. स्पर्धेत ‘आॅन दी स्पॉट’ निसर्गचित्रण स्पर्धेसाठी ‘बोर्नोवा शहराचे सौंदर्य’ असा विषय होता. या स्पर्धेत राजेश सावंत यांनी शहरातील अठराव्या शतकातील ऐतिहासिक वास्तू ‘ग्रीन मेन्शन’चे चित्रण केले, तर प्रफुल्ल सावंत यांनी ‘बोर्नोव्हा ग्रॅण्ड बाजार’चे चित्र साकारले. सावंत बंधूंची ही चित्रे दिग्गज चित्रकारांच्या परीक्षणानंतर अंतिम फेरीत पोहोचली. त्यात प्रफुल्ल सावंत यांच्या चित्राला दोन लाख ६० हजारांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर राजेश सावंत यांना सहाव्या क्रमांकाचे ६५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत अशी पारितोषिके घेणारे सावंत बंधू हे जगातील सर्वांत कमी वयाचे चित्रकार ठरले आहेत. या सन्मानामुळे ४० विविध देशांतील पारितोषिके पटकावण्याचा टप्पा सावंत बंधूंनी पार केला आहे. (प्रतिनिधी)
जागतिक स्पर्धेत प्रफुल्ल सावंत यांनी जगातील सर्वोत्कृष्ट चित्रकाराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
By admin | Published: May 25, 2015 1:29 AM