ठळक मुद्दे सातपूर येथे ‘देवराई’ व म्हसरूळला ‘वनराई’पर्यावरण दिनाच्या औचित्यावर देवराई येथे वचनपूर्ती सोहळा३४ प्रजातीच्या नामशेष झालेल्या दुर्मिळ अशा औषधी रानवेलींची लागवड
नाशिक : येथील सातपूर शिवारातील वनविभागच्या वन कक्ष क्रमांक २२२ येथील डोंगरावर अर्थात ‘देवराई’येथे (पूर्वाश्रमीचा फाशीचा डोंगर) पर्यावरण दिनाच्या औचित्यावर वचनपूर्ती सोहळा आपलं पर्यावरण व नाशिक पश्चिम वनविभागाने साजरा केला. नामशेष झालेल्या दुर्मिळ अशा ३४ प्रजातीच्या औषधी रानवेलींच्या एक हजार रोपांची लागवड नाशिककरांनी केली. एकू णच देवराईवर आता अकरा हजार भारतीय प्रजातीच्या वृक्षांसोबत वेलींची भर पडली आहे. एक परिपूर्ण जंगल विकसीत करण्याचा संस्थेने ध्यास घेतला आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्वयंसेवक मागील चार वर्षांपासून १६ हजार ५०० झाडांचे यशस्वीरीत्या संगोपन करत आहे. झाडे जगविण्याचा ध्यास घेतलेल्या एका वृक्षप्रेमीने पंधरा वर्षे शहर व परिसरात ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने जाऊन सुरक्षित जागेवर खड्डे खोदून झाडे लावण्याचा विडा उचलला.
हे कार्य करताना चार वर्षांपूर्वी या वृक्षप्रेमीच्या डोक्यात एका सुपीक कल्पनेचा जन्म झाला आणि एकाच दिवशी दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट अन् ती जगविण्याचा ध्यास शेखर गायकवाड नावाच्या वृक्षप्रेमीसह शेकडो स्वयंसेवकांनी घेतला. त्यांच्या आपलं पर्यावरण संस्थेने २०१५ साली ‘वनमहोत्सव’ची हाक प्रथम नाशिककरांना दिली.
नाशिककरांनी सातपूर भागात आयोजित असा उपक्रम पहिल्यांदाच अनुभवला आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण दिनाच्या औचित्यावर दिवसभरात उद्दिष्टापेक्षा एक हजार रोपे अधिक लावली गेली. या उपक्रमाची पुनरावृत्ती संस्थेने २०१६ मध्ये पुन्हा केली आणि लोकसहभागातून सहा हजार पाचशे रोपांची लागवड करून म्हसरूळ शिवारात वनमहोत्सव साजरा केला.केवळ झाडे लावली आणि ती रामभरोसे सोडली असे सरकारी उपक्रमाप्रमाणे या संस्थेने अजिबात केले नाही तर लावलेल्या सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. २०१५ पासून संस्था सातपूर येथे ‘देवराई’ व म्हसरूळला ‘वनराई’ विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
अशी जगविली रोपेदोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे. लावलेल्या रोपट्यांना वेळोवेळी पाणी, खत देणे, आजूबाजूला वाढलेले गवत कापणे, जाळपट्टा घेऊन वणव्यापासून संरक्षण करणे, रोपट्यांभोवती आळे करून दर आठवड्याला त्यामध्ये पाणी भरणे अशा विविध पद्धतीने संवर्धनाची कामे संस्थेचे हरित सैनिक मागील चार वर्षांपासून करत आहेत. त्याचे फलित म्हणून दोन्ही ठिकाणांच्या हजारो रोपट्यांचे रूपांतर लहान वृक्षांमध्ये झाले आहे.वचनपूर्ती सोहळापर्यावरण दिनाच्या औचित्यावर देवराई येथे संस्था वचनपूर्ती सोहळा साजरा केला. ३४ प्रजातीच्या नामशेष झालेल्या दुर्मिळ अशा औषधी रानवेलींची लागवड मंगळवारी (दि.५) लोकसहभागातून करण्यात आली. एकू णच देवराईवर आता वृक्षांसोबत वेलींची भर पडली आहे. अवघ्या चार तासांत एक हजार वेलींची लागवड पूर्ण झाली. नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यंदाही आपलं पर्यावरण संस्थेसोबत एकत्र येऊन पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला. सकाळी सात वाजेपासून तर दुपारपर्यंत नाशिकमधील विविध मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, बॅँकांचे कर्मचारी ग्रूप, मित्र मंडळ, सखींचे मंडळ, ज्येष्ठ नागरिकांचे संघ आदिंनी देवराई येथे हजेरी लावून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून योगदान दिले. अनेकांनी लावलेल्या रोपट्यांना स्वयंस्फूर्तीने पाणीही टाकले.--या प्रजातींच्या वेलींची लागवडवेली देवचाफा, कुसर, माधवीलता, सापसन, मधूनाशी, अस्थिश्रृंखला, पाठा, दमवेल, सिसस डिसकलर, कवंडळ, कावळी, जंगली मुसंडा, झुंबरवेल, भीमाची वेल, विदारी कंद, आंबोळी, वेली बांबू, बेडकी पाला, तोरण, वेलीपिपर, वाघाटी, पळसवेल, कांचनवेल, लांबकानी, गारंबी, सप्तरंगी, समुद्रशोक, लोखंडी, चाई, पिळूक अशा प्रजातीच्या वेलींची लागवड करण्यात आली आहे. या प्रजातींच्या एकूण एक हजार रोपांची लागवड देवराईवर करण्यात आली.