लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक महापालिका हद्दीला लागून असलेल्या सहा तालुक्यांचा भविष्यकालीन विकास करण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या ‘नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे नियोजन करताना जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधांचा विचार करावा लागेल तसेच विकासाची संकल्पना मांडताना नाशिक परिघातील उपलब्ध साधनसामुग्रीचा विचार करता त्या अनुषंगाने उद्योग धंद्याच्या विकासाचे क्षेत्रं निश्चित करावे लागतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्ततसेच प्राधिकरणाचे अध्यक्ष महेश झगडे यांनी केले. क्रेडाई व निमा या बांधकाम, उद्योगक्षेत्राने एकत्र येऊन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात या दोन्ही क्षेत्रांची भूमिका जाणून घेण्यासाठी झगडे यांच्या सादरीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामागची शासनाची भूमिका विषद केली तसेच विकास प्राधिकरणाची हद्द, त्यात समाविष्ट होणारे तालुके याची माहिती देताना झगडे म्हणाले, जगात एकाच वेळी विकासाच्या अंगाने अनेक घटना घडत आहेत, जग आता काही विशिष्ट भौगोलिक परिस्थितीपुरता मर्यादित राहिले नाहीतर ते एक गाव झाले आहे. जग जवळ आले असे आपण म्हणतो ते याच अंगाने त्यामुळे नवीन भागाचा विकास करायचा असेल तर त्यात फक्त पिवळा पट्टा, हिरवा पट्टा, औद्योगिक क्षेत्र, रहिवास क्षेत्र, रस्ते, पाणी अशा मर्यादित क्षेत्राचा विचार करून चालणार नाही तर जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना आपण या नवीन विकासात काय सुविधा देऊ शकतो त्या अंगाने विचार करावा लागणार आहे. गुंतवणूकदार जर आला तर त्याला जागच्या जागी सोयी-सुविधा देता आल्या पाहिजे, अशा हिशेबाने नवीन विकासाची संकल्पना मांडावी लागेल. जर गुंतवणूक झाली तर रोजगार निर्मिती होईल त्यातून क्रयशक्ती वाढीस लागून उद्योग, बांधकाम व्यवसायालापूरक चालना मिळू शकते, असेही ते म्हणाले. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात येणाऱ्या महापालिका, नगरपालिकांच्या अधिकारात हे प्राधिकरण हस्तक्षेप करणार नाही, प्राधिकरणाची वाटचाल वेगळी असेल, भविष्यात प्रदेश विकासात येणाऱ्या गावांचा विकास पाहता शहरीकरणाचा लोंढादेखील तिकडे स्थलांतरित होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगून झगडे यांनी, नाशिक परिघातील उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करता फार्मसी, कृषी प्रोसेसिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये बरेच काही करता येण्यासारखे असून, अजून काही क्षेत्रे असतील त्यादृष्टीने बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन केले. नाशिक शहरात मेट्रोची गरजनाशिक शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेता शहरात मेट्रोची गरज आहे. मात्र प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या नवीन शहरांमध्ये मेट्रोची गरज भासणार नाही अशाच प्रकारची वाहतूक व्यवस्था केली जाणार असल्याचे झगडे यांनी सांगितले. इंग्लडमध्ये १८६३ मध्ये मेट्रोची उभारणी करण्यात आली याचा विचार केला, तर नाशिक शहरात मेट्रो असावी असे सांगून नाशिक शहराचा अन्य मोठ्या शहरांशी दळणवळण संपर्क यंत्रणा वाढविण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, त्यासाठी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन रस्त्यांच्या भूसंपादनासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती करून घेतली ही बैठक फारच महत्त्वाची होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
महानगर प्रदेश विकासात जागतिक गरजांचा समावेश
By admin | Published: June 30, 2017 1:09 AM