२२ वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी घरांच्या इमारतींना रंग देऊन संसाराचा गाडा चालवितानाच विविध प्रकारच्या सूक्ष्म कलाकृती साकारण्याचा छंद संजय क्षत्रिय यांना लागला. हातावर पोट असतानाही पेंटरकाम करताना संजय क्षत्रिय यांनी आपल्या कलेला वेळ दिला. २२ वर्षांपासून संसाराचा गाडा हाकण्यासाठी इमारतींना रंग देऊन अर्थकारणाची सांगड घातली. पोटासाठी हे काम करतानाच जादुई हात व कलासक्त मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे नवीन कलाकृती उभारण्याचा छंद त्यांनी पदरमोड करून जोपासला आहे. अगोदर रंगकाम आणि आता हार्डवेअरचा व्यवसाय करणाऱ्या क्षत्रिय यांनी या छंदापोटी आतापर्यंत लाखों रुपयांचा खर्च केला आहे. कुटुंब सांभाळतानाच लाखमोलाचे छंद जोपासण्याची कलाही क्षत्रिय यांनी अतिशय लीलया पार पाडली.
कलेची जादू लाभलेले क्षत्रिय यांचे हात कधीच रिकामे नसतात. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा नवीन कलाकृती साकारत असते. विडी कामगाराचा मुलगा असलेल्या संजय यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मात्र छंदातून आजपर्यंत त्यांनी ३३ हजार ५०० हजार सूक्ष्म गणेशमूर्ती साकारल्या आहेत. व्हाइटिंग पावडर, शाडू माती आणि डिंक यापासून साकारलेल्या या सूक्ष्म मूर्ती पाव इंचापासू ते तीन इंचापर्यंत आहेत. काही मूर्ती तीन तर काही पंचमुखी आहेत. दरवर्षी ते दोन ते तीन हजार सूक्ष्म मूर्ती बनवितात. हजारों सूक्ष्म गणेशमूर्ती साकारणाऱ्या क्षत्रिय यांची दृष्टी काही औरच म्हणावी लागेल. सूक्ष्म गणेशमूर्ती साकारतांना त्यांना त्यांची पत्नी वंदना, मुलगी पूजा व अक्षदा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. क्षत्रिय कुटुंबीय गेल्या २२ वर्षांपासून दिवसांतून काही तास खर्च करून डोळ्यात तेल घालून व मानपाठ एक करून छंद जोपासत आहेत.
दरवर्षी सूक्ष्म गणेशमूर्ती बनविण्यात हातखंडा असलेल्या क्षत्रिय यांनी यापूर्वी गणेशाची विविध रूपे साकारली आहेत. क्षत्रिय यांनी कॅसेटच्या कव्हरवर सुईने कोरलेल्या एक हजार १११ अतिसूक्ष्म प्रतिमा भिंग लावून पाहाव्या लागतात. तर सुपारीवर साकारलेल्या अकरा गणेशमूर्ती पाहून आश्चर्य होते. सिमकार्डवर १८ गणेशमूर्ती कोरून त्यांनी सर्वांना चकित केले आहे. तर नखांवर अकरा गणेशमूर्ती कोरून त्यांनी वेगळे करून दाखविण्याचा पराक्रम केला आहे. नवीन कलाकृती उभारण्याचा छंद त्यांनी पदरमोड करून जोपासला आहे. वयाच्या ५१व्या वर्षी या हरहुन्नरी कलाकाराची ‘सूक्ष्म’ दुनिया जगावेगळी आहे. क्षत्रिय यांनी आतापर्यंत ३३ हजार ५०० हजारो सूक्ष्म गणेशमूर्तींची निर्मिती केली आहे. या गणेशमूर्ती बघून जादुई हाताची दैवी देणगी लाभलेल्या कलाकाराच्या कलेबाबत वॉव!, वाह! हे शब्द सहज बाहेर पडतात. क्षत्रिय यांच्या हाताने साकारलेली सूक्ष्म गणेशमूर्तींची दुनिया पाहिल्यानंतर डोळे दिपून गेले नाही तरच नवल!
चौकट-
एक तपापासून गणेशभक्तांना कलाकृतींचा नजराणा
क्षत्रिय गेल्या १२ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात सिन्नरकरांसाठी विविध कलाकृतींचा नजराणा सादर करतात. अकरा हजार बाटल्यांचे गणेश मंदिर, आगपेट्यांपासून बनविलेले दादरचे सिध्दिविनायक मंदिर, २५ किलो साबुदाण्यापासून साकारलेला ताजमहाल, कापसापासून बनविलेले दिल्लीचे अक्षरधाम मंदिर, ८१ बालगणेशांची १० थरांची दहीहंडी, दोन हजार आइस्क्रीम काड्यांपासून गणेश मंदिर, ११ हजार सूक्ष्म गणपतींपासून बनविलेला महागणपती, साडेतीन लाख मण्यांपासून बनविलेले अमृतसर येथील सुवर्णमंदिर, अडीच हजार खडूंपासून तयार केलेले अयोध्येचे राममंदिर अशा एक से बढकर एक कलाकृती संजय क्षत्रिय यांनी साकारून सिन्नरच्या गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवाच्या काळात कलाकृतींचा नजराणा सादर केला आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सिन्नरकर सदर नजराणा पाहण्यास मुकले आहेत.
चौकट-
मोठ्या गणेशमूर्तीपेक्षा सूक्ष्म गणेशमूर्ती बनविणे अवघड आणि वेळखाऊ काम आहे. मात्र छंद जडल्याने पदरमोड करून गेल्या २२ वर्षांपासून छंद जोपासत आहे. आतापर्यंत लाखों रुपयांचा खर्च झाला. मुलींचे शिक्षण आणि घर चालविताना अनेक संकटे आली, मात्र गणरायाने सर्व विघ्न दूर करून माझा छंद पूर्ण केला. कलेला दाद मिळते, पण आर्थिक गाडा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते.
- संजय क्षत्रिय, कलाकार, सिन्नर
फोटो ओळी - सूक्ष्म ८१ बालगणेशांची १० थर लावून दहीदंडी फोडताना कलाकृती.
फोटो ओळी- सिन्नरचे कलाकार संजय क्षत्रिय यांची सूक्ष्म गणेशमूर्तींची अनोखी दुनिया.
110921\11nsk_33_11092021_13.jpg
फोटो ओळी- सिन्नरचे कलाकार संजय क्षत्रिय यांची सूक्ष्म गणेशमूर्तींची अनोखी दुनिया.