नाशिक : पृथ्वी सर्वांची आहे. या पृथ्वीवर केवळ माणसाने आपला हक्क स्वार्थापोटी गाजविणे चुकीचे असून निसर्गाच्या जीवसृष्टीचादेखील विचार करायला हवा, वन्यजीव जगविले तर पृथ्वी वाचेल आणि निसर्गाच्या प्रकोपापासून सुरक्षित राहू शकेल, असा सूर वन्यजीव सप्ताह शुभारंभाच्या निमित्ताने उमटला.नाशिकवनविभागाच्या वतीने मंगळवारी (दि.१) वन्यजीव सप्ताहचा शुभारंभ व राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती व प्रबोधनपर उपक्रमांविषयीची माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी रस्त्यावरील वनविश्रामगृहात झालेल्या चर्चासत्राला प्रमुख पाहूणे म्हणून सर्प अभ्यासक भरत जोशी यांच्यासह मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, तुषार चव्हाण, विभागीय वन अधिकारी स्वप्नील घुरे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी जोशी यांनी दुर्मीळ होत जाणा-या सर्पांविषयी माहिती देत अन्नसाखळीत सर्पांची भूमिका पटवून दिली. यावेळी त्यांनी महाराष्टÑात आढळणा-या विषारी, बिनविषारी सर्पांच्या प्रजातींची माहिती देत सर्पदंशनंतर उपचाराविषयीदेखील उपस्थितांना जागरूक केले. महाराष्टÑात सर्वाधिक सर्पांचा मृत्यू भीतीपोटी आणि अंधश्रध्देतून होत असल्याचे यावेळी ते म्हणाले. सर्प हा अन्नसाखळीमधील अत्यंत महत्त्वाचा सरपटणारा प्राणी आहे. सर्पदंशापासून मानवाने स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे? विषारी सर्पांचा वावर कधी व कोठे असू शकतो? याविषयीदेखील त्यांनी बारकाईने माहिती समजावून दिली.इको-एको संस्थेचे स्वयंसेवक वन्यजीवप्रेमी अभिजीत महाले यांनी वन्यजीवांचे रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान घ्यावयाची खबरदारी याविषयी माहिती सांगितली. अलिकडे ‘रोडकिल’ही समस्या मानवाप्रमाणेच वन्यजीवांसाठीदेखील धोक्याची बनली आहे. वन्यजीवांचे रस्त्यांवर मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगून लक्ष वेधले. पक्षीमित्र अनिल माळी यांनी गिधाडसारख्या दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्याच्यासंवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. सुदैवाने नाशिकच्या सभोवताली गिधाड अजूनही अस्तित्वात असून त्यांचे संवर्धन संरक्षण आवश्यक असून त्यासाठी ‘गिधाड संरक्षित क्षेत्र’ तत्काळ विकसीत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी टी.जे.चौहान बिटको विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. आभार वनसंरक्षक गणेश झोळे यांनी मानले.
जागतिक वन्यजीव सप्ताह : ‘वन्यजीव जगवा, पृथ्वी वाचवा...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:34 PM
सर्पदंशापासून मानवाने स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे? विषारी सर्पांचा वावर कधी व कोठे असू शकतो? याविषयीदेखील त्यांनी बारकाईने माहिती समजावून दिली.
ठळक मुद्दे‘रोडकिल’ही समस्या धोक्याची वन्यजीवांचे रस्त्यांवर मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण वाढले