नाशिकरोड : देवळाली गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली़ वाघा-सिंहाच्या झडपेप्रमाणे झालेल्या कुस्तीपटूंच्या डावपेचांनी उपस्थित ग्रामस्थांनी डोळ्यांची पारणे फेडली होती़देवळाली गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यांची शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या यात्रोत्सवात रविवारी सुटीमुळे सकाळपासूनच भर पडली होती़ भाविकांसह रहिवासी व महिलांनी रविवारी सकाळपासून देवळाली गावात म्हसोबा महाराजांचे दर्शन व खरेदीसाठी गर्दी केली होती़ यात्रेनिमित्त दुपारी साडेचार वाजता देवळालीगाव आठवडे बाजार कुस्ती मैदानात पंच कमिटीच्या वतीने सायंकाळी पाच वाजेपासून कुस्ती मैदानाची पूजा करून कुस्ती दंगलीस प्रारंभ झाला़ पन्नास रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत किमतीच्या कुस्त्या लावण्यात आल्या होता़ लहान मुलांपासून पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील, आर्टिलरी सेंटरमधील कुस्तीपटू स्पर्धेत सहभागी झाले होते़सायंकाळपासून कुस्ती मैदान कुस्तीपटूंच्या लढती बघण्यासाठी गर्दीने फुलून गेले होते़ पंचकमिटी व वैयक्तिकरीत्या हजारो रुपयांचे पारितोषिक असलेल्या कुस्त्यांनी उपस्थितांची पारणे फेडली़ पंचकमिटीचे अध्यक्ष शांताराम कदम, बाळनाथ सरोदे, प्रदीप देशमुख, रुंजा पाटोळे आदिंसह पंचकमिटी व मान्यवरांनी कुस्तीपटूंचे स्वागत केले़ (प्रतिनिधी)
देवळाली गाव यात्रेत कुस्त्यांची दंगल
By admin | Published: March 06, 2017 1:14 AM