संजीव धामणे, नांदगाव : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान चुकीने दोनदा बँकेत संबंधित लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. ‘ते’ अतिरिक्त अनुदान वसूल करण्यासाठी बँकेस दिलेल्या शासकीय पत्राचा अन्वयार्थ काढण्यात झालेल्या गडबडीमुळे, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडची प्रधानमंत्री किसान योजनेची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.
अवकाळी अनुदानाचा राज्य शासनाशी संबंध आहे तर प्रधानमंत्री किसान योजनेचा केंद्र सरकारशी संबंध आहे. अवकाळीचे अनुदान दोनदा बँक खात्यात चुकून वर्ग झाल्याने त्याची वसुली करण्यासाठी तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी आयडीबीआय बँकेला पत्र दिले. पत्रात ‘डबल’ झालेली रक्कम वसूल करण्यासाठी खात्यातून रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आल्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या. दरम्यान, प्रधानमंत्री किसान योजनेचे २००० रुपये खात्यावर जमा झाले. आयडीबीआय बँकेच्या सूचनेवरून ग्रामीण महाराष्ट्र बँकेने सदरचे पैसे देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्न चिन्ह उभे राहिले. बँकेपुढे असाच पेच निर्माण झाला. एकीकडे राज्य शासनाचे अवकाळी नुकसानीचे चुकून दुप्पट दिलेले अनुदान वसूल करावयाचे तर दुसरीकडे केंद्र सरकारने आयकर भरणारे व इतर उत्पन्नाची साधने असलेल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री योजनेच्या खात्यात वर्ग झालेला निधी वसूल करून शासनाला भरावयाचा. यामुळे बँकेकडून, डबल अनुदान न मिळालेले व उत्पन्नाच्या इतर साधनांचा स्रोत नाही, अशा खातेधारक शेतकऱ्यांनांही खात्यातून पैसे काढण्यास आडकाठी केली गेली. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
इन्फो
...ही आहे शेतकऱ्यांची भूमिका!
अवकाळी अनुदानाची खात्यावर अतिरिक्त जमा झालेली रक्कम कमाईच्या स्रोतामधून वसूल करण्यात आली तर त्यास शेतकऱ्यांचा आक्षेप नाही. मात्र प्रधानमंत्री योजनेतून मिळणारी रक्कम अनुदान आहे. तो प्राप्तीचा स्रोत नाही. म्हणून ती रक्कम रोखता येणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
कोट....
माझ्या खात्यावर अवकाळीचे अनुदान जमा नाही. तसेच इतर उत्पन्नाची साधने नाहीत. तरीही प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे काढण्यास बँक तहसीलदारांच्या पत्राचा हवाला देऊन पैसे देण्याचे नाकारत आहे.
- भगवान मोरे, शेतकरी
कोट.....
बँकेला अवकाळी नुकसानीच्या दुप्पट अनुदान प्रकरणी वसुलीच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान रोखण्याच्या नाहीत. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू.
उदय कुलकर्णी, तहसीलदार
इन्फो
आतापर्यंत १२ लाख रुपये वसूल
प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत लाभ मिळालेले शेकडो शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या इतर उत्पन्न स्रोतांमुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरले असून सदर रक्कम भरून घेण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत १२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तथापि नांदगाव तालुक्यात इतर उत्पन्नातून आयकर भरणारे ५३० शेतकरी असून त्यांना प्रधान मंत्री किसान अनुदान योजनेतून देण्यात आलेले ५३ लाख रुपये व मयत असूनही लाभ घेतलेले, तसेच जे दुसरीकडे काम करत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत अशा २१० व्यक्तींना मिळालेले १८ लाख रुपयांचे अनुदान वसूल करण्यात येत आहे. पात्र नसताना लाभ घेतलेल्या व्यक्तींना तलाठ्यामार्फत नोटिसा दिल्या आहेत. त्यातल्या १२ लाख रुपयांचा भरणा शासकीय तिजोरीत जमा करण्यात आला असून उर्वरित रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.