नाशिक : खरे तर शहरी भागात वावरतानाच चरायचे असेल तर मुक्तपणे चरावे, पण सावध असू नये काय, शेवटी घोडा हा पाळीव प्राण्यांमध्येच समाविष्ट आहे, मग त्याला जे पाळतात त्यांच्या सान्निध्यात राहून घोड्याला एवढीही बुद्धी आली नसेल तर काय उपयोग? झाकण नसलेल्या चेंबरमध्ये घोडा पडणे यात सर्वाधिक दोषी म्हणजेच घोडाच आहे, त्यानंतर त्याला मोकळे सोडणारे त्याचे मालक, त्यानंतर महापालिकेने कर्तव्यनिष्ठेतेने टाकलेला ढापा म्हणा की चेंबरचे झाकण चोरून नेणारा चोर आणि अखेरीस चोराकडे दुर्लक्ष करणारी महापालिका.....पखालरोडवरील खोडे मळा येथे एक घोडा चेंबरमध्ये पडला आणि मग त्याला जरी अग्निशमन दलाने वाचविले आणि तो जिवंत बाहेर निघाला. भूतदया असणाऱ्यांच्या दृष्टीने ही खूप मोठी बाब ठरली. परंतु घोड्याच्या जागी एखादा मुलगा किंवा माणूस असता तर...संवदेनशील नागरिकांना याचीही भीती वाटू शकते. विशेषत: मुंबईत अशाप्रकारच्या तीन घटना घडल्याने तेथील नागरिक धास्तावले आहेत. परंतु नाशकात रोज कोणती ना कोणती घटना घडते आणि मग सवयीप्रमाणे काहीही झाले की, महापालिकेवर खापर फोडले जाते, अशा सरावाने अधिकारी सराईत झाले. त्यांच्या भावना बोथट झाल्या की नाही माहिती नाही, परंतु जबाबदारी सफाईदारपणे अन्य कोणाच्या माथी कशी मारता येईल याचे कसब मात्र या अधिकाऱ्यांच्या अंगी बाणले गेले.एका चेंबरमध्ये घोडा पडणे ही खरे तर त्यांच्या दृष्टीने किरकोळ बाब, पण कोणी विचारणा केलीच तर उत्तरही तयार हवं. मग ज्यांच्या अखत्यारित हा सारा विषय येतो अशा बांधकाम खात्याच्या अधिकाºयाला घडलेल्या घटनेबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून अत्यंत सफाईदारपणे चुकांची क्रमवारी ठरविली गेली. खोडे मळ्याचा तो मोकळा भाग असला तरी लोकांनी जनावरे सोडणे कितपत योग्य आहे. बरे तेथे चेंबरवर ढापे म्हणजे झाकण होतेच, पण कोणातरी गर्दुल्याने आपल्या नशेसाठी ते चोरून भंगारात दिले असावे आणि त्यातून नशा केली असावी (झाकण चोरताना तो गर्दुलाच चेंबरमध्ये पडला नाही हे सुदैवच म्हणा) असा या अधिकाºयाचा कयास... बरे मग महापालिकेची काहीच चुकी नाही काय, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी ते मान्य केले, परंतु महापालिकेने चेंबरवर झाकण टाकून दुर्लक्ष केले ही ती चूक असे मान्य करीत आता ती सुधारण्यासाठी पुन्हा चेंबरावर झाकण लावण्याचे आदेश दिले आहेत. चेंबरवरील झाकणे चोरणाºया गर्दुल्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, तसेच मोकाट पशू सोडणाºयांवर कारवाईसाठी पशू वैद्यकीय विभागाला कळविले, असे त्यांनी सांगितले आणि कृती तसेच कारवाईवर पडदा पडला.घोडे बेचके सोना...चेंबरमध्ये घोडा पडल्याने त्याविषयी बरीच चर्चा रंगली मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोपही झाले, अशाप्रकरच्या मृत्यूगोलामुळे कुणाचा तरी बळी गेला तर काय होणार, अशी भीती अनेकांना वाटू लागली खरी, परंतु अनेकांनी मनपा ‘घोडे बेच के सो रही हैं’ अशी चर्चा रंगली.
चुकला घोडा, मग मालक, त्यानंतर चोर आणि शेवटी महापालिका!
By संजय पाठक | Published: July 27, 2019 12:41 AM