नाशिकः चंपाषष्ठीनिमित्त भाविकांनी तळी भरताना केलेला यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोटचा जयघोष आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेरचा परिसर दिवसभर दुमदुमून गेला होता. रविवारी गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असूनही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यंदा करोनामुळे मंदिर बंद असल्याने मंदिराबाहेर दर्शनाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे भाविक मंदिराबाहेरच दर्शन करून जात होते. मात्र, मंदिराबाहेर अगदी गोदाघाटालगतच ही सोय करण्यात आली असल्याने छोट्याशा जागेत भाविकांची दिवसभर रीघ लागली होती. दर्शनाला येणाऱ्यांपैकी बहुतांश भाविक तळी भरताना यळकोट यळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करीत होते. तळी भरण्यासाठी एका ताम्हनात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन सदानंदाचा येळकोट’ किंवा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा तीन वेळा जयघोष करीत उचलला जातो. त्यानंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करण्यात आली. तसेच देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.यावेळी उपस्थितांना भंडारा लावला जात होता. कुलदैवत खंडोबा असलेल्या अनेक भाविकांनी वांग्याचे भरीत, राेडगा, भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदा मंदिराबाहेर जत्रा भरवण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मंदिराबाहेर जत्रेची गर्दी नसली तरी भाविकांनी गर्दी केली होती. महानगरातील विविध ठिकाणच्या खंडोबाच्या मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती.
इन्फो
देव भेटवले
पंचवटीतील पेठ रोडच्या मल्हारी राजाला रविवारी सकाळी वाजतगाजत गोदाघाटावर आणण्यात आले. खंडेराव महाराजांची पालखी काढून दोन्ही देव भेटवण्यात आले. तसेच त्यानंतर मल्हारी राजाला पंचवटीतील म्हसोबाची भेट घडवून पुन्हा पेठरोडवरील त्यांच्या मंदिरात पुनर्स्थापित करण्यात आले.