मालेगाव : शहरातील यंत्रमाग व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. सुताचे वाढलेले दर व घटत्या कापड मागणीमुळे यंत्रमाग व्यावसायिकांनी येत्या मंगळवारपासून (दि. २२) कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परिणामी शहरातील सुमारे अडीच लाख यंत्रमागांचा खडखडाट थांबणार आहे. या बंदमुळे यंत्रमाग मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. शहरातील हबीब लॉन्समध्ये विविध यंत्रमाग संघटनांची बैठक झाली. या बैठकीत आर्थिक नुकसान, सुताचे वाढते दर, कापड दरात घसरण आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. यंत्रमाग व्यवसायावरील मंदीचे सावट दूर करण्यासाठी शासनाने यंत्रमाग कारखान्यांचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करावी, सुताचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साठेबाजी रोखावी आदी मागण्या करण्यात आल्या. या बैठकीत यंत्रमाग संघटनांनी व्यवसाय बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला मुजीब उल्ला, साजिद अन्सारी, निहाल दानेवाला, शब्बीर डेगवला आदी उपस्थित होते.
सूत दरवाढीमुळे यंत्रमागाचा खडखडाट थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 3:25 PM