न्यायडोगंरी : नांदगाव तालुक्यातील पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अन्न सुरक्षा योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित ठेवण्यात आल्याने याबाबत सतत दोन वर्षांपासून पाठपुरावा करून पुकारलेल्या लढ्यास अखेर यश प्राप्त झाले आहे. नवीन २२८४ लाभार्थ्यांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आल्याने न्यायडोंगरीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ लोकसंख्येच्या ७६:३२ टक्के लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात. सन २०११ च्या गावच्या लोकसंख्येनुसार न्यायडोंगरी गावाची लोकसंख्या ९०९० असताना वरील टक्केवारीनुसार ७०१३ लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असताना नांदगावच्या पुरवठा विभागाकडून मात्र फक्तचार हजार सातशे एकोणतीस लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात येत होता. याविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून सतत पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी पाठपुरावा केला आहे. नांदगाव पुरवठा विभाग मात्र वेळकाढूपणा करीत असल्याने अखेर मोरे यांनी सदरची तफावत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने दखल घेत नांदगाव पुरवठा विभागाची चांगलीच कानउघडणी केली. नांदगावच्या तहसीलदार पु. न. दंडिले यांनी शशिकांत मोरे यांना व पुरवठा विभागाचे अधिकारी विजय थोरात, स्वस्त धान्य दुकान गोकुळ राठोड, गणेश पाटील यांना समोरासमोर बोलवून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. त्या २२८४ लाभार्थी लाभापासून वंचित असल्याची बाब उघड होताच पुरवठा खोतेचे पत्र क्रमांक २९८/२०१५ नुसार अगोदर पात्र ठरविण्यात आले़(वार्ताहर)
अन्न सुरक्षा योजनेसाठीच्या लढ्याला यश
By admin | Published: September 20, 2015 10:42 PM