सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे फत्तेपूर आणि संगमनेर तालुक्यातील पारेगाव या गावाच्या शिवेवर असलेल्या डोंगरावर अश्विनाथ देवस्थान आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, पुणे, मुंबई, औरंगाबाद या भागातील देवस्थानाला वर्षभर गर्दी असते. श्रावणातील तिसऱ्या गुरुवारी होणाऱ्या एक दिवशीय यात्रेला लाखो भाविक उपस्थित असतात. अश्विनाथ देवस्थान पारेगाव, ता. संगमनेर कार्यक्षेत्रात असून, दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा भरविण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. गुरुवारीदेखील दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी असणारे सर्व दरवाजे बॅरिकेड लावून बंद केले आहेत. संगमनेर निऱ्हाळे पारेगाव, वावी, निमोण, घोटेवाडीच्या गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. वावी पोलीस ठाण्यामार्फत तपासणी नाक्यांची उभारणी करण्यात आली असून, भाविक गडावर येणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे.
अश्विनाथ महाराज गडावरील यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:16 AM