▪️बैल पोळा आला काही दिवसांवर : साज महागल्याने बाजारात अद्याप शुकशुकाटचं
पोळा तोंडावर : साज महागल्याने बाजारात अद्याप शुकशुकाटच
देवगांव (तुकाराम रोकडे) : बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र, कोरोनाचे सावट व अगोदरच पावसाच्या लहरीपणाने घायाळ झालेल्या शेतकरीराजास बैलांच्या साजाच्या साहित्यातील चार ते पाच टक्के महागाईची झळ सोसावी लागणार आहे. बारा महिने अन्नदात्यासोबत शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा. ग्रामीण भागातून हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी पोळा सणावर कोरोना महामारीचा परिणाम दिसून येत आहे. त्यातच पूर्वा नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आला असून निर्बंधही सैल होताना दिसत आहेत. मात्र, बैल पोळा सणाच्या खरेदीसाठी शेतकरी अद्यापही बाहेर पडला नसल्याचे दिसून येत आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट घोंगावत आहे. राज्य शासनाने टाळेबंदी अंतर्गत निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांनी ढवळ्या- पवळ्याच्या साज खरेदीकडे पाठ फिरवली होती. चार- पाच दिवसांपासून सूर्य आग ओकत होता. त्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता. मात्र, पूर्वा नक्षत्राच्या सुरुवातीलाच कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून अवघ्या पाच दिवसांवर बैल पोळा असताना शेतकरी बैलांच्या साजासाठी चौकशीकरिताही आला नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
--------------------
चार ते पाच टक्के दरवाढ
पोळा सण पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने झुल, घुंगरू, झालर, नाथे, कवडी, माथोटी, बाशिंग, वैविध्यपूर्ण दोरखंड फॅन्सी वस्तूंची दुकाने सजली आहेत. यंदा गेल्या वर्षीपेक्षा प्रत्येक वस्तूवर चार ते पाच टक्के भाववाढ आहे. वर्षातून एकदाच बैल पोळा सण येतो. शेतकरी राजा आपल्या ढवळ्या-पवळ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. मात्र, नापिकी आणि कोरोनामुळे या सणाच्या उत्साहावरही विरजण पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे साज खरेदीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
----------------
साजाची किंमत..
झुल- १००० ते ३००० रुपये जोडी
घुंगराचा पट्टा - २०० ते १००० रुपये जोडी
हिरव्या लाल रंगाचे गोंडे - ४० ते ८० रुपये जोडी
फॅन्सी माळा - ३५ ते १०० रुपयांपर्यंत जोडी
दोर - ७० ते १०० रुपये जोडी
नाथ - ४० ते ६० रुपये जोडी
कवड्याची माळ - ७० ते १०० रुपये जोडी
मोरपंखी - ५० ते १०० रुपये जोडी.