नाशिक- ना ढोल ताशा ना मोठा जयघोष परंतु तरही मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभु रामचंद्राचा जन्मोत्सव आणि रामरथ हा नाशिकचा ग्रामोत्सव असला तरी यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी असल्याने मंदिरात कोणालाही प्रवेश नसल्याने ग्रामोत्सव सुनासूनाच पार पडला.
नाशिकचे काळाराम मंदिर हे आराध्य दैवत! देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून पर्यटक आणि भाविक नाशिकला आल्यानंतर प्रभु रामचंद्राच्या चरणी लीन झाल्याशिवाय जात नाहीत. या काळाराम मंदिरात चैत्र पाडव्यापासून रामचंद्राचे नवरात्र सुरू होते त्या निमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतातच परंतु सायंकाळी प्रवचनांबरोबर सांस्कृतिक सेवा रामाच्या चरणी रूजु केली जाते. रामजन्मोत्सवांनतर एकादशीला रामरथ आणि गरूढ रथ काढला जातो. ही नाशिकची मोठी परंपरार आहे. तथापि, यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिरात देखील मोजक्या चार ते पाच पुजाºयांनाच परवानगी होती. दरवेळी याठिकाणी पाळण्यात रामजन्म होतो, पाळणा गीत होते. महिला फुगड्या खेळतात, आणि ढोलपथकेही असतात. परंतु यंदा असे काहीच नव्हते. पुजा-यांनी मंदिरात जन्मोत्सव साजरा केला.
दरम्यान, काही तुरळक नागरीक कार्यक्रमानंतर मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन निघून जात होते. परंतु मंदिरात कोणालाही प्रवेश नसल्याने यंदा जन्मोत्सवाच्या दिवशीही भाविकांना दर्शन घेता आलेले नाही.