नाशिक : हातावर पोट असणाऱ्या कामगारांबरोबरच गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांनाही कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे देखावे तयार करणाऱ्या शिल्पकांरांच्या व्यावसायिकांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाऊनमुळे गुजरातमधून येणारा कच्चा माल येण्यास विलंब होत आहे. रेड झोन वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊनची नियमावली शिथिल करण्यात आली असली तरी व्यावसायिकांकडे कच्चा मालच उपलब्ध होत नसल्याने पुरवठा करण्यात अडचणी येत होता. आता हळूहळू कच्चा मालाचा पुरवठा होऊ लागला असला तरी वाढलेला वाहतूक खर्च व मनुष्यबळ यामुळे मूर्तिकारांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या तीन-चार महिने आधी मूर्तिकार कामास सुरुवात करतात. यंदाचा गणेशोत्सव २२ ऑगस्टला सुरू होणार आहे; परंतु मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालच कारागिराकडे नाही. शाडूची माती, प्लास्टर आॅफ पॅरिस, मातीमध्ये मिसळण्यासाठी काथ्या हा कच्चा स्वरूपातील माल गुजरात व राजस्थान येथून मागविला जातो. त्याचबरोबर लागणारे रंग मुंबई येथून आणले जाते. या कामाला दरवर्षी एप्रिलपासूनच सुरुवात होते; परंतु यंदा मूर्ती तयार करण्यासाठी हाताशी काचा माल वेळीच उपलब्ध झाला नसल्याने सध्या जवळ असलेल्या मातीतूनच मूर्ती साकारल्या जात असल्या तरी ती संख्या कमी आहे.
यंदा गणेशोत्सवावरही दिसणार कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 8:30 PM