नाशिक : गोदावरी नदीतील पात्रातील प्रदूषण टाळण्यासाठी यंदा महापालिकेच्या वतीने ‘मिशन विघ्नहर्ता’ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत शक्यतो मूर्ती विसर्जन नदीपात्रात करूच नये, असे आवाहन महापालिका आयुक्त यांनी केले आहे. अर्थात, प्लास्टर ऑफ पॅरीस संदर्भातील विसर्जित मूर्तींचे यंदा दान करण्याची सक्ती करण्यात येणार आहे. तर शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन टाळण्याबाबत केवळ आवाहन करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेकडून यंदा प्रथमच सहा विभागांत फिरते तरण तलाव तयार करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सव उत्साहात असला तरी हा उत्सव पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धक ठरावा तसेच नाशिक कोरोना संसर्ग वाढू नये याची महापालिकेच्या वतीने काळजी घेतली जात आहे. त्यासाठी मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येत असून, आता विसर्जनच्या दिवशी ऑनलाइन टाइम स्लॉट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याचबरोबर विसर्जन स्थळांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात पारंपरिक विसर्जन स्थळांबरोबरच यंदा सहा विभागांत सहा फिरते तरण तलावांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी नदीपात्रात मूर्तींचे विसर्जन होऊच नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. उच्च न्यायालयाने नुकत्याच पीओपीच्या गणेशमूर्तींवर घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने नदीपात्राचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन करताना मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करताच ती औपचारीकरीत्या विसर्जित करून महापालिकेच्या मूर्ती संकलन केेंद्रांवर जमा करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
इन्फो...
शासनाने केवळ पीओपी मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन होऊ नये अशी भूमिका घेतली असून, दुसरीकडे मात्र महापालिकेने पाचव्या आणि सातव्या दिवशी शाडूमातीच्या मूर्ती विसर्जित करण्यावरून वाद निर्माण झाला होता. आता महापालिका आयुक्तांनी नदीपात्रात मूर्ती विसर्जित करू नये, असे आवाहन केले असले तरी दुसरीकडे मात्र, जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा यावेळी मनपा आयुक्तांनी दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याने आवाहन की सक्ती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केाट...
नदीपात्रात प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती दान करण्याचे केवळ आवाहन करण्यात आले आहे. यातही पीओपी मूर्ती नदीपात्रात जाऊ नये अशी भूमिका आहे. त्याचबराेबर पुढील वर्षी तर पूर्णत: पीओपी मूर्तींवर बंदी असणार आहे.
- कैलास जाधव, आयुुक्त, महापालिका
इन्फो...
यंदा फिरते तरण तलाव
नदीकाठी विसर्जनस्थळी महापालिकेच्या वतीने कृत्रिम तरण तलाव तयार करण्यात येतात, परंतु यंदा टँक ऑन व्हील म्हणजेच फिरते तरण तलाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. शहरातील ५० किंवा त्यापेक्षा जास्त फ्लॅट्स असणाऱ्या अपार्टमेंट यांच्याकरिता मागणीनुसार फिरता विसर्जन टॅंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.