मार्च महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने यंदा विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षाही होऊ शकली नाही. विद्यार्थ्यांची एकूणच शैक्षणिक प्रगतीचा विचार करता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र जून उजाडला तरी शाळा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन शालेय गणवेश दरवर्षी दिले जात. परंतु यंदा शाळाच सुरू न होऊ शकल्याने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात होती. चालू शैक्षणिक वर्षाचे निम्मे शैक्षणिक सत्रदेखील कोरोनामुळे वाया गेले. त्यानंतर शाळा टप्पाटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याचे ठरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सुमारे २ लाख, ६२ हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश देण्यात आला आहे. शालेय व्यवस्थापन समितीकडेच गणवेशाचा रंग व कपडे शिवण्याची जबादारी सोपविण्यात आली असून, त्यापोटी ७ कोटी रुपये अनुदानही शाळा पातळीवर वर्ग करण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शंभर टक्के सुरू झाल्या असून, दररोज ८० टक्के विद्यार्थी हजेरी लावत आहेत. गेल्या १५ दिवसात एकही कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षक आढळलेला नाही. शाळांमध्ये स्वच्छतेची पुुरेपूर खबरदारी घेण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले.
चौकट====
सादिल अनुदानाचे वाटप
काेरोना प्रतिबंधासाठी शाळांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी शाळांना सादिल अनुदान देण्यात आले आहे. शाळेतील शिक्षकांच्या संख्येवर व त्यांच्या वेतनाच्या चार टक्के रक्कम सादिल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पाच ते दहा हजारापर्यंत शाळांना अनुदान वाटप करण्यात आले. शिवाय ग्रामपंचायतींकडील चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातूनही निधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.