कोरोनाच्या काळात संपूर्ण समाजमन तब्बल आठ ते दहा महिने घाबरलेले होते. कोरोनाचा विषाणू कोणत्या मार्गाने शरीरात प्रवेश करील याची कोणतीही शाश्वती नसल्याने प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली. आरोग्य यंत्रणा त्यासाठी कार्यरत होतीच, परंतु या काळात कोणतीही जोखीम घेण्यास कोणीच तयार नसल्याने त्याचा परिणाम कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर झाला. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर दरवर्षी शस्त्रक्रियेसाठी होणारी महिलांची गर्दी रोडावली. तर आरोग्य यंत्रणेनेही जोखीम नको म्हणून अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी हात अखडता घेतला आहे. सन २०१९ मध्ये जिल्ह्याला देण्यात आलेले महिलांच्या शस्त्रक्रियेचे २६,९६८ उद्दिष्ट जवळपास ६८ टक्के पूर्ण झाले होते. त्यात १८४०६ महिलांनी स्वत:हून शस्त्रक्रिया करून घेतली तर त्याच बरोबर पुरूषांनीही पुढाकार घेतल्याने त्यांच्याही ८७५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोरोनामुळे मात्र सन २०२०मध्ये हेच प्रमाण अवघ्या ९ टक्क्यांवर येऊन थांबले आहे.
----------------
एक नजर शस्त्रक्रियांवर
सन २०१९ - १८४०६ - महिलांनी केली नसबंदी
८७५ पुरूषांनी केली नसबंदी
सन २०२०- २४०४ महिलांनी केली नसबंदी
२०३ पुरूषांनी केली नसबंदी
-------------
नपुंसकत्वाची भीती
महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत फारसा काही गैरसमज नसला तरी, अशा शस्त्रक्रियेतून महिलांची मुले जन्माला घालण्यापासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता होत आहे. परंतु पुरूषांचे मात्र नसबंदीबाबत अनेक गैरसमज आहेत. नसबंदीने नपुंसकत्व येते त्याचबरोबर कामोत्तेजनावर परिणाम होतो. असा समज मोठ्या प्रमाणावर पसरविण्यात आल्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांच्या शस्त्रक्रिया अगदीच अल्प प्रमाणात होत आहेत.
---------------
कोरोनामुळे शस्त्रक्रियेत घट
कोरोनाच्या सुमारे आठ ते दहा महिन्यांच्या काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत होती. त्यातच समाजात देखील एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणी धजावले नाही. आता मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर महिला व पुरूषांच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी