नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते; मात्र त्यासाठी शेतकरी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने पाहिजे तितके उत्पादन मिळत नाही. भात लागवडीसाठी पूरक हवामान,पाऊस व जमीन असूनही भाताच्या उत्पादनात वाढ होत नसल्याने कृषी विभागाने भात लागवडीसाठी विविध प्रयोग राबविण्याचे ठरविले असून, त्याची सुरुवात गेल्या वर्षापासून करण्यात आली आहे. हाताने भात लागवड करण्यापेक्षा यंत्राच्या सहाय्याने लागवड केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. त्यासाठी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यंत्राच्या सहाय्याने भात लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी पारंपरिक भात व यंत्राच्या साह्याने भात लागवड यात नेमका कसा फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती दिली. यंत्राच्या साह्याने भात लागवड दोन ते तीन मजुरांकरवी एका दिवसात चार ते पाच एकरावर लागवड करता येते. ही लागवड ठराविक अंतरावर ओळीने करता येते. पारंपरिक लागवडीसाठी एकरी सहा ते सात हजारपर्यंत खर्च येतो, तर यंत्राच्या साह्याने तीन हजारात लागवड होते. यामुळे पैशाची बचत तसेच उत्पन्नात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन वेळेची बचत होते, असे सांगितले. कृषी पर्यवेक्षक संजय पाटील यांनी घरगुती भात बियाणावर तीन टक्के मिठाची, बुरशीनाशकाची व जैविक खतांची बीजप्रक्रिया कशी करतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच जे बियाणे बाजारातून खरेदी केले जाते त्यावर जैविक खतांच्या बीज प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. हरसूल मंडळ कृषी अधिकारी अनिल गावित यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये कशाप्रकारे भाग घेता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली. भाताची चटई नर्सरी कशी तयार करावी याविषयी महिंद्रा कंपनीचे डीलर भुसारे व मच्छिंद्र चुंबळे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी अरुण राऊत, प्रमोद ढोकचवळे यांनीही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांसह आंबोलीचे सरपंच लचके, अरुण मेढे, ज्ञानेश्वर मेढे, नवनाथ बोडके, शरद बोडके, गोकुळ मेढे, संदीप मेढे, बळीराम मेढे उपस्थित होते.
(फोटो०१ भात)