नाशिक : दारणा धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या वीजप्रकल्पातून यंदा विक्रमी वीजनिर्मिती करण्याचा इरादा पाटबंधारे खात्याने बोलून दाखविला आहे. गेल्या सात वर्षांपासून या खासगी वीज प्रकल्पातून लाखो युनिट वीजनिर्मिती केली जात आहे. दारणा धरणातून नगर व मराठवाड्यांसाठी पाणी सोडले जाते तसेच जिल्ह्यातील निफाड, येवला, नांदगाव या तालुक्यांनाही या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. त्यामुळे धरणाच्या पाण्याची साठवणूक क्षमता पाहता २०११ मध्ये एका खासगी कंपनीने धरणाच्या पायथ्याशी हायड्रो वीज प्रकल्प उभारला असून, या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक युनिट मागे पाटबंधारे खात्याला पाच पैसे अदा केले जातात. दरवर्षी साधारणत: १२ ते १४ लाख युनिट विजेची निर्मिती या प्रकल्पातून केली जाते व खासगी कंपनी त्याची विक्री राज्य सरकारला करते. यंदा जुलै महिन्यातच धरणाने ८० टक्क्यांची पाणी पातळी गाठल्यामुळे किमान १८ लाख युनिट वीजउत्पादन होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दारणातून यंदा विक्रमी वीजनिर्मितीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:02 AM