सिन्नर : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळी सणासाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टणात, सवलतीत दाखल झाल्या असून, यंदाही भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचे वर्चस्व दिसून येत आहे. सिन्नरच्या गणेशपेठ, सरस्वती पूल, भैरवनाथ शॉपिंग सेंटर, शिवाजी चौक, महालक्ष्मी रोड आदि मुख्य बाजारपेठांसह शहरातील सर्व भागात चिनी वस्तूंचे गारुड दिसून येत आहे. गॅरंटीची कोणतीही खात्री नसताना माफक किंमत एवढेच वैशिष्ट्य असणाऱ्या या चिनी बनावटीच्या वस्तूंना सिन्नरकरांची प्रथम पसंती मिळत आहे. त्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लायटिंगच्या माळा, आकाशकंदील, पणत्यांची माळ, फटाके, हॅलोजन ट्यूब, आबालवृद्धांसाठीचे गिफ्ट आयटम्स, फळे, पणत्या, टिकल्या फोडण्याची बंदूक आदि वस्तूंचे आगमन झाले आहे. कमी दर, चमक-ढमक असलेले आवरण, आवडीचे रंग या वैशिष्ट्यांमुळे चायनामेड वस्तू सिन्नरकरांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. स्थानिक कारागिरांनी मेहनतीने केलेल्या वस्तू मागे पडण्याची भीती यामुळे निर्माण झाली असून, त्याचा आर्थिक फटकाही बसण्याची शक्यता आहे. चायनामेड वस्तूंमध्ये महिलांसाठीचे मेकअप आयटम्स, आॅफिस स्टेशनरी, स्मार्ट फोन्स, लॅपटॉप, टॅबलेट्स, घड्याळे, डिजिटल फोटोफ्रेम, नाईट लॅम्प, रूम फ्रेशनर अशा अगणित वस्तूंना यंदाही सिन्नरकरांनी पसंती दिली आहे. (वार्ताहर)
यंदाच्या दिवाळीवरही चायनामेडचे गारुड
By admin | Published: October 21, 2016 1:06 AM