नाशिक - शहरात गेल्या तीन महिन्यांपासून ‘स्वाइन फ्ल्यू’चा धोका टळला असताना चार दिवसांपूर्वी जेलरोड परिसरातील एका महिलेचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जेलरोड परिसरात सर्वे सुरू केला आहे. दरम्यान, डेंग्यूचा प्रभाव मात्र जवळपास ओसरला असून जानेवारी महिन्यात डेंग्यूची लागण झालेले नऊ रुग्ण आढळले आहेत.शहरात गेल्या तीन-चार वर्षांपासून स्वाइन फ्ल्यूने थैमान घातले होते. मागील वर्षी महापालिका हद्दीत २६४ रुग्णांना स्वाइन फ्ल्यूची लागण झालेली होती तर मनपा हद्दीबाहेरील रुग्णांची संख्या २३० इतकी होती. त्यामध्ये महापालिका हद्दीतील ३२ रुग्णांचा तर हद्दीबाहेरील ४२ रुग्णांचा बळी गेला होता. वर्षभरात स्वाइन फ्ल्यूने ७४ बळी घेतले होते. नोव्हेंबर २०१७ पासून स्वाइन फ्ल्यूचा जोर ओसरला होता. उपचारासाठी दाखल होणा-या रुग्णांची संख्याही घटली होती. स्वाइन फ्ल्यू हद्दपार होत असतानाच गेल्या बुधवारी (दि.२४) जेलरोडवरील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील एक ४५ वर्षीय महिला मुंबईनाक्यावरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि.२५) तिचा मृत्यू झाला. यावर्षी स्वाइन फ्ल्यूने पहिला बळी घेतला आहे. शहरात मात्र, अन्य कुठेही स्वाइन फ्ल्यूचा संशयित रूग्ण दाखल असल्याची नोंद महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नाही. त्यामुळे, महापालिकेने जेलरोड परिसरात स्वाइन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर सर्वे सुरू केला असून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. स्वाइन फ्ल्यू पुन्हा डोके वर काढतो की काय, या भीतीने वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील स्वाइन फ्ल्यूचा कक्ष सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी दिली.डेंग्यूचे ७८ रुग्ण दाखलशहरात डेंग्यूचा प्रभाव आता ओसरत चालला आहे. मागील वर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला होता. यावर्षी जानेवारी महिन्यात ७८ रुग्ण संशयित म्हणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी ९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आता उन्हाळ्यात पाणी साठविण्याची गरज भासणार असल्याने पुन्हा डेंग्यूबाबत वैद्यकीय व आरोग्य विभागाला दक्षता घ्यावी लागणार आहे. .
नाशकात ‘स्वाइन फ्ल्यू’चा यावर्षीचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 6:41 PM
महिलेचा मृत्यू : डेंग्यूचा मात्र प्रभाव ओसरला
ठळक मुद्देवर्षभरात स्वाइन फ्ल्यूने ७४ बळी घेतले होतेनोव्हेंबर २०१७ पासून स्वाइन फ्ल्यूचा जोर ओसरला होता