गणेश धुरी । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार वर्षांपासून बंद असलेले नाशिक सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर प्रथमच धगधगण्याची चिन्हे आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिकसह वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना व राज्यातील अन्य सात साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या नऊही साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यास शासन पातळीवरून मदत करण्यास सकारात्मक भूमिका सरकार घेणार असल्याचे वृत्त आहे.राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत असून, अनेक साखर कारखान्यांवर लिलावाची व जप्तीची कारवाई ओढवली आहे. त्यातच हे साखर कारखाने टिकावेत म्हणून राज्य सरकारने साखर कारखान्यांना विकू नये, यासाठीचा निर्णयही जाहीर केला आहे. राज्यातील साखर कारखाने आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यातच सहकाराला सरकार मदत करीत नसल्याचा ठपका खोडून काढण्यासाठी तसेच (पान ७ वर)ग्रामीण भागात पक्ष आणखी बळकट होण्यासाठी सहकार क्षेत्राला आर्थिक मदतीचा हात देऊन त्याठिकाणी भाजपाप्रणित संचालक मंडळ पुढील काळात निवडून येण्यासाठी येनकेन प्रकारे भाजपा प्रयत्नशील आहे. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा व मध्यावधी निवडणुकांची चर्चा पाहता भाजपाने ग्रामीण भागात आणखी घट्ट मुळे रोवण्यासाठी आता सहकार क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक जिल्ह्णाचा विचार करता वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर वर्षानुवर्षे माजीमंत्री कै. डॉ. दौलतराव अहेर यांचेच संचालक मंडळ निवडून येत होते. आता त्यांचे चिरंजीव आमदार डॉ. राहुल अहेर व माजी सभापती केदा अहेर यांच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी वसाकाला राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देत कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे. आता नाशिक सहकारी कारखान्यावरही भाजपाप्रणित प्राधिकृत मंडळ नियुक्त करून हा साखर कारखाना सुरू होण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील आठवड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नासाकाला १४ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ‘वसाका’चाही प्रस्ताव पाठविणारनाशिकचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना व नाशिक सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदतीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. नाशिकच्या दोन साखर कारखान्यांसह राज्यातील एकूण नऊ साखर कारखाने या गळीत हंगामात सुरू व्हावे, यासाठी सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री नाशिक नासाकालाच नव्हे तर वसाका व राज्यातील सात अशा नऊ साखर कारखान्यांना आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी बैठकीत ठेवण्यात आला असून, हे कारखाने या हंगामात सुरू होण्याची चिन्हे आहेत.
यंदा धगधगणार ‘नासाका’चे बॉयलर!
By admin | Published: July 06, 2017 11:52 PM