आवर्तन पद्धतीने या वर्षी पाथरे बुद्रुकरांना यात्रोत्सवाचा मान मिळाला होता. खंडोबा महाराज हे पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या तिन्ही गावाचे तसेच परिसरातील ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. यात्रोत्सव निमित्त खंडोबा महाराज मूर्तीची व मुकुटाची सुशोभित रथातून मिरवणूक काढण्यात आली. कावड्या, तकतराव अर्थात देवाचा गाडा यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. दत्त जयंतीपासून सुरू झालेला हा उत्सव साधारणपणे आठवडाभर चालतो. यावेळी मोठ्या प्रमाणात खंडोबा भक्तांनी दर्शन घेतले. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलल्या कुटूंबांनी यात्रेनिमित्त गावी आवर्जून हजेरी लावत ग्रामदैवताचे दर्शन घेतले. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कावड, खंडेरावाचे मुकुट यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी खंडोबा महाराजांच्या मुकुटाची पूजा केली. वाघे मुरळी यांनी खंडोबाची गाणी नाचत गायली. धनगर वाडा ते खंडोबा मंदिर या दरम्यान डफांच्या तालावर धनगरी नृत्य करत मिरवणूक मंदिरापर्यंत पोहोचली. देवाच्या मूर्तीचा अभिषेक होऊन चांदीचा मुकुट आणि वस्त्रे परिधान करण्यात आली. मिरवणुकीत डीजेच्या तालावर घोड्यांचा नाच पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. उत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल हे एक खास आकर्षण असते. कुस्त्यांच्या दंगलीसाठी नगर, कोल्हार, नेवासा, कोळपेवाडी, संगमनेर, सिन्नर, अकोले येथील तसेच परिसरातील नामांकित कुस्तीगिरांनी हजेरी लावली. जवळपास ५० कुस्त्या झाल्या. विजेत्यांना शंभर रुपयांपासून तर एकवीसशे रुपयांपर्यंतच्या बत्तीस हजार रुपयांची बक्षीसे व प्रमाणपत्र विजेत्या कुस्तीवीरांना देण्यात आली. तमाशा शौकिनांसाठी संगीता पुणेकर, वसंतराव नांदवळकर, विठाबाई भाऊ मांग यांचे लोकनाट्य तमाशांचे आयोजन करण्यात आले होते.
पाथरेत दुमदुमला ‘येळकोट येळकोट’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 5:49 PM