दाभाडी हा शेतीत विविध प्रयोग करणारा परिसर म्हणून ओळखला जातो. येथील अनेक शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यातीलच दाभाडी येथे वास्तव्यास असणारे व आघार बुद्रुक शिवारात शेती करणारे शेतकरी महेंद्र निकम यांनी शेतात शेवगा, पपई, सिमला मिरची, ब्रोकोली या सारख्या पिकांचे प्रयोग केले आहेत. आता निकम यांनी थोडी वेगळी वाट निवडत ३० गुंठे शेतात चक्क रंगीबेरंगी फ्लॉवरची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. त्यासाठी पिवळ्या व जांभळ्या वाणाची निवड केली असून त्याचे यशस्वी उत्पादन त्यांनी घेतले आहे. प्रामुख्याने मेट्रोपोलिटन शहरात व मोठमोठ्या मॉलमध्ये या रंगीबेरंगी फ्लॉवरला मोठी मागणी आहे. रंगीबेरंगी फ्लॉवरच्या उत्पादनातून निकम यांना चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. या रंगीबेरंगी फ्लॉवरची परिसरात जोरदार चर्चा असून परिसरातील लोक निकम यांच्या शेताला भेट देऊन कुतूहलाने पाहणी करीत आहेत. कृषिमंत्री दादा भुसे यांनी निकम यांच्या शेतात जाऊन पाहणी करुन त्यांच्या प्रयोगाचे कौतुक केले. शेतकऱ्यांनी अशा प्रयोगशील शेतीची कास धरून आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन भुसे यांनी केले.
इन्फो...
रंगीत फ्लॉवरचा उगमस्रोत युएसए येथे झाला. भारतात दहा वर्षांपासून याची सुरुवात झाली. महाराष्ट्रात प्रथमच मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे या पीक पद्धतीची लागवड करण्यात आली. हे फ्लॉवर पीक प्रामुख्याने जांभळ्या व नारंगी रंगात आढळते. यात ‘विटामिन सी’ची मात्रा अधिक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने देखील ते लाभदायी ठरते.