येवला : नगरपालिका कर्मचा-यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटना संघर्ष कृती समितीच्या वतीने येथील पालिका कर्मचा-यांनी शनिवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता पालिका कार्यालयासमोर सुमारे तासभर धरणे आंदोलन केले. यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.नगरपालिका प्रशासनास कर्मचा-यांनी दि. १४ डिसेंबर रोजी आंदोलनाबाबत पूर्वसूचनेची नोटीस दिली होती. त्यानुसार राज्य शासनाने जाहीर केलेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे पालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचा-यांना विनाअट त्वरित कायम करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सफाई कर्मचा-यांना घरे मिळावीत, तसेच संवर्ग कर्मचा-यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्मचा-यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे संघटक प्रशांत पाटील, उपाध्यक्ष घनश्याम उंबरे, सचिव तुषार लोणारी, रोजंदारी कृती समितीचे किशोर भावसार, मनोज गुढेकर यांची भाषणे झाली. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात कामगार सेनेचे पदाधिकारी अर्जुन शिंदे, सुनील जाधव, उदय परदेशी यांच्यासह सुमारे १०० कर्मचारी सहभागी झाले होते.
येवला पालिका कर्मचा-यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 6:48 PM
मागण्यांचे निवेदन : सातवा वेतन आयोगाची मागणी
ठळक मुद्देनगरपालिका प्रशासनास कर्मचा-यांनी दि. १४ डिसेंबर रोजी आंदोलनाबाबत पूर्वसूचनेची नोटीस दिली होती.