येवला : पालिका कर्मचार्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन न मिळाल्याने पालिका कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. १ जूनपर्यंत कर्मचार्यांचे रखडलेले एप्रिल व मे महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन द्यावेत, अन्यथा अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलनाचा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश चिटणीस शशिकांत मोरे यांनी दिला आहे.शासनाकडून जिल्हाधिकार्यांमार्फत पालिका कर्मचार्यांना सहायक अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने वेतन, निवृत्तीवेतन रखडले आहे. या कामी संघटना काही दिवसांपासून शासनाच्या वित्त विभागाच्या संपर्कात आहे. अनुदान प्राप्त होण्यास आणखी तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या कामांमुळे अनुदान प्राप्तीला उशीर होत असल्याचे जबाबदार अधिकार्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी अन्य शासकीय विभागातील कर्मचार्यांचे वेतन मात्र नियमित होत आहे. केवळ पालिका कर्मचार्यांच्या बाबतीतच दुजाभाव का? असा सवाल संघटनेचे प्रशांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.पालिका कर्मचारी, साफसफाई, पाणीपुरवठा व अन्य नागरी सुविधांसह लोकसभा निवडणुकीचीदेखील कामे प्रामाणिकपणे पार पाडतात. तरीही वेतनात दिरंगाई होऊन कर्मचार्यांची अडचण केली जाते. यामुळेच संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
येवला पालिका कर्मचारी वेतनापासून वंचित
By admin | Published: May 19, 2014 7:18 PM