येवला पश्चिम भागात पेरणीची लगबग
जळगाव नेऊर (भाऊराव वाळके) : गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या आद्रा नक्षत्रातील पावसाने येवला तालुक्यातील ३३ हजार हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले असून, दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ झाला आहे.
येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्रातील झालेल्या पावसावर मशागती करून मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण पेरणी केल्यानंतर गेली पंधरा वीस दिवसांपासून पाऊस उघडल्याने हजारो हेक्टरवरील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती, पण रविवार आणि सोमवार रोजी झालेल्या यावर्षी मृग नक्षत्रात सुरुवातीला पाऊस झाला, त्यानंतर नक्षत्र कोरडे गेल्याने अनेक भागांत पेरण्या खोळंबल्या होत्या. पश्चिम भागात वरुण राजाच्या कृपादृष्टीने आर्द्रा नक्षत्रात खरीप पिकांसाठी पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे बळीराजाच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी खरिपाची पेरणीस सुरुवात केली आहे. मका पिकांची टोकन पद्धतीने पेरणी केली जात असून, इतर पिके, बैलपांभर, ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली जात आहे. परिसरातील जळगाव नेऊर, नेऊरगाव, पिंपळगाव लेप, जऊळके, एरंडगाव, पुरणगाव, शेवगे, सातारे परिसरात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्या असल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच बियाणे, रासायनिक खते व मजुरीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मका, सोयाबीन, खते यांच्या प्रत्येक पिशवीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहेत.
-------------------
७४ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट
यावर्षी कृषी विभागाने ७४ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यापैकी उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर साधारणपणे ३३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली होती व आता आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर उर्वरित पेरणी होणार आहे.
--------------
जोरदार पावसाची प्रतीक्षा
आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. पेरणीची लगबग सुरू असली तरी, नगदी पीक म्हणून कांदा पीक घेतले जाते. नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्या असल्याने दहा-पंधरा दिवसांने कांदा बियाणे टाकण्यासाठी विहिरीत पाणी नाही, त्यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
------------------
पिकांना जीवदान
गेली पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात येऊन दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. पण आद्रा नक्षत्राने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
----------------
खरीप हंगामाला सुरुवात
गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आपल्या शेतात मशागत करण्यात व्यस्त होता, खरीप हंगामातील पिकावरच पुढील अर्थचक्र अवलंबून असल्याने आद्रा नक्षत्रातील पावसाने हजेरी लावल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे.
--------------------
येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात आद्रा नक्षत्राने हजेरी लावल्याने मका पिकाची टोकण पद्धतीने सुरु असलेली लागवड. (२९ जळगाव नेऊर २)
===Photopath===
290621\29nsk_9_29062021_13.jpg
===Caption===
२९ जळगाव नेऊर २