तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सौंदाणे गावात केवळ २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. वडेललाही कोरोना नियंत्रणात आहे. तालुक्यात वर्षभरात पाच हजार २४१ जण कोरोनाबाधित सापडले होते. बाधितांचा आकडा वाढत असताना दाभाडी, झोडगे, उमराणे, भायगाव येथे डीसीएचसी सेंटरमध्ये तातडीची उपचार सुविधा करण्यात आली आहे. उपचारानंतर चार हजार ५१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेेत. असे असताना तालुक्यातील येसगाव बुद्रुक येथे दुसऱ्या लाटेत अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. शासन प्रशासन व ग्रामपंचायतींच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहेत. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, घरात जाताना साबणाने हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यावर भर दिला जात आहे. कोरोना संसर्गामुळे विवाह सोहळे व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अवघ्या २० ते २५ जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळे केले जात आहेत. दुकानदारांसह दूध, भाजीपाला व किराणा विक्रेते नियमांचे पालन करतात. ग्रामस्थ सकाळी शेताकडे निघून जातात. ज्येष्ठ नागरिक काळजी घेत आहेत. बाहेरगावी जाण्यासह नागरिक टाळाटाळ करीत आहेत. फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून औषध फवारणी केली जात आहे तर तालुक्यातील सौंदाणे येथे पहिल्या लाटेतही कोरोना नियंत्रणात होता. सध्या सौंदाणेला २० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ग्रामपंचायतीकडून कोरोना प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात आहे. होम टू होम संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. सौंदाणेला आतापर्यंत चार वेळा ॲंटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचणींवर भर दिला जात आहे. आरोग्याच्या सुविधा वेळेवर पुरविल्या जात असल्यामुळे कोरोना नियंत्रणात आहे तर तालुक्यातील वडेल येथे कोरोनाच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. वडेल गावात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली होती; मात्र जनजागृती व लसीकरणावर जोर दिल्यामुळे कोरोना नियंत्रणात आहे. आरोग्य यंत्रणेसह पोलीस कर्मचारी, आशासेविका, शिक्षक कोरोनाची जनजागृती करत आहेत. गृहविलगीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे वडेल येथे कोरोना नियंत्रणात आहे.
कोट....
गावात नेहमीच औषध फवारणी केली जाते. कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट पार करण्यावर भर आहे. गावात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. ग्रामस्थांनी काळजी घेतल्यास व सहकार्य केल्यास गाव असेच कोरोनामुक्त राहील.
- कल्याणी शेळके, सरपंच, येसगाव बुद्रुक
कोट....
पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यानंतर औषध फवारणी, कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांसह शिक्षक कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. धार्मिक कार्यक्रमही कमी लोकांच्या उपस्थितीत केले जात आहे. शासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळत आहे.
- नरेंद्र सोनवणे, सरपंच, वडेल
कोट....
सौंदाणेला कोरोना चाचण्यांवर भर दिला जात आहे. शुक्रवारपासून (दि. ३०) गावातील संशयित रुग्णांची एचआरसीटी तपासणी शुल्क ग्रामपंचायत भरणार आहे. ग्रामस्थांवर आर्थिक बोजा नको म्हणून ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना दिले जाणारे वेतन खर्च केले जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धर्तीवर सौंदाणे येथे सरपंच सहाय्यता निधी म्हणून बॅंकेत खाते उघडण्यात आले आहे. नागरिकांच्या होम टू होम तपासणी करण्यात आली आहे.
- डॉ. मिलिंद पवार, सरपंच, सौंदाणे