नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून रेशन व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे दुकानदारांना धान्य मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी सोमवारी येवला शहरातील रेशन दुकानदारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून धान्य पुरवठा अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले. रमजान महिन्यात तरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात रेशन मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. येवला तालुक्यात शंभराहून अधिक रेशन दुकाने असून, तीन महिन्यांपासून रेशन दुकानदारांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांचा दुकानदारांनाच रोष ओढवून घ्यावा लागत आहे. मे महिन्यात मंजूर झालेले धान्य जून महिन्यात उशिराने देण्यात आले, तर जून महिन्याचे धान्य मिळणार नाही, असे आता पुरवठा विभागाकडून सांगितले जात असल्याची तक्रार रेशन दुकानदारांनी केली. अनेक दुकाने महिला बचत गटाला चालविण्यासाठी देण्यात आली असून, त्यांनाही धान्य मिळत नसल्याने दुकाने चालविणाऱ्या बचत गटांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. काही दुकानदारांनी धान्यासाठी चलने भरून ठेवली; परंतु तरीही त्यांना धान्य मिळत नाही. त्यांची चलनाची रक्कमही अडकून पडली आहे. अशा परिस्थितीत दुकाने चालविणे कठीण झाले असून, रमजानचा महिना सुरू झाल्याने शहरातील बहुतांशी मुस्लीम कुटुंबे रेशनच्या धान्यावर अवलंबून असतात त्यांनाही धान्य मिळत नाही. किमान शासनाने त्यांना तरी धान्य द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सकाळपासून आलेल्या या धान्य दुकानदारांनी सायंकाळपर्यंत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची वाट पाहण्यात घालविली. अखेर सायंकाळी त्यांची भेट झाल्यावर त्यांनी निवेदन सादर केले.
येवल्याचे रेशन दुकानदार मेटाकुटीस
By admin | Published: June 30, 2015 12:14 AM