नाशिक : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगसमूहाने नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देऊन चोवीस तास उलटत नाही तोच भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र पतंजलीच्या या उद्योगाचे श्रेय स्वत:कडे घेत, आपल्या पाठपुराव्यामुळेच बाबा रामदेव यांनी ही तयारी दर्शविल्याचा दावा करून पालकमंत्र्यांना शह दिला आहे. नाशिक शहरातील विकासकामांना ज्या-ज्या वेळी मंजुरी देण्याचा विषय पुढे येताच, विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये श्रेय घेण्यावरून ‘योगा’ केला जात असल्याचा पुनर्प्रत्यय या निमित्ताने आला आहे. मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निमाच्या कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाशिकमध्ये कृषी पिकांवर आधारित पतंजलीचे फूड पार्क उद्योग सुरू करण्याबाबत बोलणे झाल्याचे सांगून लवकरच या उद्योगासाठी शासकीय जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. नाशिकच्या रोजगार निर्मितीत हातभार लागण्याबरोबरच, कृषिमालाला योग्य ते दर मिळण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला होता. नागपूर नंतर नाशिकची पतंजली उद्योगासाठी निवड होणार असल्याने जिल्'ात गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा सर्व क्षेत्रातून व्यक्त केली जात असताना, भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र आपल्यामुळेच योगगुरू बाबा रामदेव यांनी नाशिकची निवड केल्याचा दावा केला आहे. दि. १६ नोव्हेंबर रोजी नगर येथे व दि. ४ डिसेंबर रोजी नागपूर येथे बाबा रामदेव यांची भेट घेऊन नाशिक जिल्'ातील कांदा व टमाटा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व पतंजलीच्या मिनी फूड पार्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली असता, बाबा रामदेव यांनी या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार फरांदे यांचे म्हणणे आहे. फरांदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी केलेले प्रयत्न माहितीस्तव सादर केले आहे. त्यामुळे फरांदे यांचे म्हणणे मान्य केल्यास मुख्यमंत्र्यांनी बाबा रामदेव यांच्याशी चर्चा केल्यामुळेच पतंजली फूड पार्क नाशिकमध्ये येत असल्याचा पालकमंत्र्यांचा दावा खोटा ठरू लागला आहे. विशेष म्हणजे आमदार फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नांची पालकमंत्र्यांनाच माहिती नसल्याचा दुसरा अर्थ काढला जात असून, भाजपातच याची चर्चा होऊ लागली आहे.
पतंजलीच्या ‘उद्योगा’वरून श्रेयवादाचा ‘योगा’
By admin | Published: December 22, 2016 1:03 AM