नाशिक : योगा हे बुद्धीचे शास्त्र असून,आयुष्य निरामय होण्यासाठी योगाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रेमचंद जैन यांनी केले.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. स्वातंत्र्यसेनानी स्व. शांताराम पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'योगा आणि आरोग्य' या विषयावर डॉ जैन यांनी संवाद साधला. पतंजली ऋषींनी योगावर मोठे कार्य असून त्याद्वारे जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. यापूर्वी जीवन योगमय होते, गुरुकुल परंपरेत योगाचा अंतर्भाव होता, त्यामुळे जीवन सुखकर होण्यास मदत झाली. योगा म्हणजे मोक्षप्राप्ती असल्याचा मानस डॉ.जैन यांनी सांगितले. व्याख्यानादरम्यान डॉ जैन यांनी विविध आसनांची माहिती दिली. ऋषी मुनींनी सांगितलेल्या गोष्टी अनेकांना पटत नाहीत, अष्टांग मार्गातील जी तत्वे आहेत त्याचे अनुकरण केल्यास स्थितप्रज्ञ जीवन जगणे शक्य होईल,असेही ते म्हणाले. योगाला शास्त्रीय बैठक असल्याने अनेक डॉक्टर योगा करण्याचा सल्ला देतात, त्यामुळे दुःखहारक,पीडाहरक जीवन जगता येणे शक्य होईल,असेही डॉ. जैन यांनी स्पष्ट केले. योग म्हणजे मनाच्या विचारावर नियंत्रण, विचारांच्या चक्राला थांबविणे म्हणजे योग असेही ते म्हणाले. याप्रसंगी जयवंत पाटील उपस्थित होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.