नाशिक : सकारात्मक तणावामुळे तो खेळात बाजी मारतो तर नकारात्मक तणावामुळे खेळाडू नैराश्याच्या गर्तेत बुडतो. त्यामुळे खेळाडूने मैदानामध्ये व मैदानाबाहेर शारिरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही जोपासले पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या देशात जितके महत्त्व योगाला दिले जाते तितके खेळाला दिले जात नाही, हे दुर्देव, अशी खंत विशाखापट्टणम विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. व्ही. आर. राजू यांनी व्यक्त केली.
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आयोजित ‘करंट ट्रेन्ड्स इन स्पोर्टस सायकॉलॉजी फॉर इनहॅन्सिग स्पोर्टस परफॉरमन्स’ विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन सोमवारी (दि.६) करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुरस्कृत हे चर्चासत्र दोनदिवसीय असून या चर्चासत्रात खेळाडू व त्यांच्या कामगिरीवर होणारा ताणतणावाचा परिणाम व तणावापासून बचावाच्या उपाययोजना यावर मंथन होणार आहे. उद्घाटनाप्रसंगी राजू प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर डॉ. गौतम गवळी, रविंद्र नाईक, प्राचार्य बापुसाहेब जगदाळे, उपप्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज, अजिंक्य दुधारे, डॉ. विनित रकिबे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजू म्हणाले, देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक खेळाडू मग तो कोणत्याही खेळाच्या मैदानात असो किंवा बाहेर, तो दोन प्रकारच्या तणावाखाली असतो. सकारात्मक तणावामुळे तो खेळात बाजी मारतो तर नकारात्मक तणावामुळे खेळाडू नैराश्याच्या गर्तेत बुडतो. तणावाचे दोन प्रकार असतात; मात्र तणाव म्हटला की सर्वसामान्यांपुढे एकच प्रकार येतो तो म्हणजे नकारात्मक. सकारात्मक तणाव हादेखील एक प्रकार लक्षात घेतला पाहिजे. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शोधपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.