येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरु झाली. या निमित्ताने रघूजीराजे शिंदे यांचा मुखवटा, कावड मिरवणूक तसेच महापूजा आणि समारोपनिमित्ताने छबिना मिरवणूक असे तीन दिवस कार्यक्र म होणार आहे.सोळाव्या शतकात येवलवाडी गावची स्थापना राजे रघुजीबाबा नाईक शिंदे यांनी केली होती. चारशे वर्षाचा इतिहास असलेल्या यात्रेचे आताही मोठ्या उत्साहात आयोजन करून त्यांना अभिवादन केले जाते.रघूजीराजे शिंदे यांचे वंशज सुनील शिंदे यांच्या गढीवरील घरात आजही राजेंचा मुखवटा आहे. मंगळवारी (दि.६) सकाळी ९ वाजता कोपरगाव येथील गंगा नदीच्या पाण्याने भरून आणलेल्या कावडीची गंगादरवाजा परिसरातील खंडू वस्ताद तालमीपासून पारंपारिक हलकडी व ढोल ताश्याच्या जयघोषात पालखीतून राजे रघुजी शिंदे यांचा मुखवटयाची मिरवणूक काढण्यात येणशर आहे. त्यानंतर या गंगेच्या पाण्याने रघूजीराजे यांचा अभिषेक केला जाईल. रात्री सिनेतारका आरती पवार बारामतीकर यांचा आॅर्केस्ट्राचा कार्यक्र म होणशर आहे. बुधवारी (दि.८) सकाळी महापूजा व सायंकाळी छबिना मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
सोळाव्या शतकात रघुजीराजे पाटील यांनी पाटोद्याची पाटीलकी विकत घेऊन नाशिक, औरंगाबाद व नगर या व्यापारी नगरांना जोडणारे ठिकाणी असलेली येवलवाडी येथे स्थलांतर केले. त्यांनी येथील जंगल नष्ट करून गावाच्या विकासासाठी अहमदाबाद, हैद्राबाद व पैठण येथून विणकाम करणाऱ्या कारागिरांना येवल्यात आणले. सर्व जातीधर्माच्या लोकांना आश्रय दिला. त्यांनी मुस्लीम बांधवासाठी मशीद उभारली. आजही ही मशीद पाटील मशीद म्हणून ओळखली जाते. शहराच्या सुरक्षेसाठी चारही दिशांना दरवाजे उभारले. त्यांना आजही गंगादरवाजा, पाटोदा दरवाजा, नागड दरवाजा, अंकाई दरवाजा या नावाने ओळखले जाते. राज्यात कुठेही नसेल असे गावाच्या संस्थापकाचे मंदिर गावात असून त्यांची यात्रा देखील आजपावेतो साजरी केली जाते.