आज श्रावण वद्य अष्टमी. श्रीकृष्ण जयंती. श्री विष्णू पृथ्वीवर अवतीर्ण झाले तो भाग्याचा दिवस. श्रीकृष्णाचे नाव जरी घेतले तरी आपल्या मन:चक्षुंपुढे मेघाप्रमाणे शामल, कटी पितांबर, त्यावर शेला, छातीवर रूळणारी वैजयंतीमाला व श्रीवत्सलांछन, कुरळ्या केसांवर खोवलेलं मोरपीस, कपाळी चंदनाची उटी, शंख, चक्र, गदा, पद्मधारी, मुरलीवादक, मुखावर विलोभनीय तेज व निर्मळ हास्य अशा अलौकिक पौरूषी सौंदर्याची मूर्ती उभी राहते.श्रीकृष्ण जन्मापूर्वी सर्वत्र अराजकता माजली होती. मथुरेत स्वत: राजा बनण्यासाठी प्रत्यक्ष आई-वडिलांना व मृत्यूच्या भीतीने बहीण व मेहुण्याला कैद करून कंस जनतेवर अत्याचार करत होता. मगध देशचा राजा जरासंध याने त्याच्या शतशीर्ष यज्ञासाठी अन्यायाने ८६ राजांना कैद केलं होतं व आणखी चार राजांना कैद करून त्या श्ंभर राजांचा बळी देऊन आपला शतशीर्ष यज्ञ पूर्ण करणार होता. त्याने अनेकवेळा द्वारकेवर आक्रमण केले. शिशुपाल, शाल्व यांसारखे राजेदेखील रयतेचा छळ करत होते. हस्तिनापुरात शकुनी, धृतराष्टÑ, दुर्योधन सत्तेसाठी पांडवांवर अन्याय करत होता.अशा पार्श्वभूमीवर-यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतअभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे...या वचनानुसार दुष्टांचे हनन, सज्जनांचे रक्षण व धर्माची संस्थापना करण्यासाठी विष्णूने कृष्णरूपात पृथ्वीवर द्वापारयुगात अवतार घेतला व आपल्या अलौकिक कार्याने द्वापारयुग- ज्याला श्रीकृष्णयुग म्हणतात ते घडवलं म्हणून तो युगपुरुष बनला. त्याने अनेक राजांचा पराभव केला पण कधीही सिंहासनावर ‘राजा’ म्हणून न बसता जनतेच्या मनामनावर हृदयसम्राट म्हणून राज्य केले.त्याने त्याच्या जीवनात आलेल्या प्रत्येक स्त्रीचा उद्धार केला व स्त्रीच्या प्रत्येक नात्याचा नवीन अर्थ विशद केला व त्यांना मोक्षपद प्राप्त करून दिले. भगवान परशुराम, गर्गमुनी, अंगिरस, भृगु, दुर्वास, सांदीपनी यांसारख्या थोर ज्ञानी गुरूंचे शिष्यत्व पत्करून तो चौदा विद्या व चौसष्ट कलांचा परिपूर्ण अधिकारी बनला. अर्जुनाच्या माध्यमातून गीतेद्वारे श्रीकृष्णाने जगाला ज्ञानयोग, कर्मयोग, सांख्ययोग व भक्तियोगाचे अध्यात्म समजावून दिले. प्रेमयोगाचा तर तो निर्माताच आहे कारण त्याने वेळोवेळी आपल्या भक्तांना संकटातून तारले व त्यांचा योगक्षेम चालवला. त्याचे मित्रप्रेमही कृष्ण-सुदामा भेटीतून आपणा सर्वांना ज्ञात आहे. भीष्म, अर्जुन यांसारख्या भक्तांना आपल्या विराट रूपाचे दर्शन घडवून विकृतीयोग समजावून सांगितला. महाभारत संग्रामात वेळोवेळी युद्धनीती समजावूनसमजावून पांडवांना म्हणजे धर्माला जय मिळवून दिला. कारण तो उत्कृष्ट वक्ता, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ, हितचिंतक व धुरंधर राजकारणी होता. ‘यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य यांसारख्या अनेक गुणसंपदेचा तो जणू सागर होता. तरीही त्याचं जीवन षड्रिपूंच्या वासनांपासून कमलदलाप्रमाणे निरामय, निर्लेप, प्रवाही होतं इतकं की ब्रह्मशाप खरा करण्यासाठी व धर्मसंस्थापनेसाठी त्याने स्वत:च्या कुळाचा नाश व महाभारत घडवून आणलं. गांधारीचा शाप आनंदाने स्वीकारून स्वत:चे महानिर्वाण घडवून आणलं तरीही गांधारीचा आशीर्वाद मागितला. गांधारीने आशीर्वाद दिला की, ‘देवकीपुत्रा, माझे तुला आशीर्वाद आहेत की, कुणीही कौरव झाला नाही, पांडव झाला नाही असा तू यावत्चंद्रदिवाकरौ अक्षय किर्तीवंत होशील. अशा या जगत्वंद्य श्रीकृष्णाला कोटी कोटी प्रणाम !-प्रा. सुलभा जामदार, नाशिक
योगयोगेश्वर श्रीकृष्ण : मार्गदर्शक तत्त्वज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 1:30 PM
आज श्रावण वद्य अष्टमी. श्रीकृष्ण जयंती. श्री विष्णू पृथ्वीवर अवतीर्ण झाले तो भाग्याचा दिवस. श्रीकृष्णाचे नाव जरी घेतले तरी आपल्या मन:चक्षुंपुढे मेघाप्रमाणे शामल, कटी पितांबर, त्यावर शेला, छातीवर रूळणारी वैजयंतीमाला व श्रीवत्सलांछन, कुरळ्या केसांवर खोवलेलं मोरपीस, कपाळी चंदनाची उटी, शंख, चक्र, गदा, पद्मधारी, मुरलीवादक, मुखावर विलोभनीय तेज व निर्मळ हास्य अशा अलौकिक पौरूषी सौंदर्याची मूर्ती उभी राहते.
ठळक मुद्देदुष्टांचे हनन, सज्जनांचे रक्षण व धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतारअनेक दुष्ट राजांचा पराभव केला, परंतु स्वत:लालसेपासून दूर