येवला : पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गटातून पाच जागांसाठी १९, तर पंचायत समिती गणाच्या दहा जागांसाठी ४५ असे एकूण ६४ उमेदवारांचे भवितव्य मंगळवार, दि. २१ रोजी इव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. मतदान असल्यामुळे बाजारदेखील बंद ठेवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता येवला तहसील आवारात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक एक, मतदान अधिकारी क्रमांक दोन, शिपाई आणि विभागनिहाय क्षेत्रीय अधिकारी यात १० टक्के राखीव कोटा धरून ११०२ कर्मचारी यांची हजेरी घेण्यात आली. काही मतदान केंद्रांवर अनुभवी केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्याचे फेरआदेश देण्यात आले. मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तहसील आवारात प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षाने साहित्याची मोजदाद करीत आपल्या सहकार्याच्या मदतीने मॉकपोल घेतले. आवारात बीप वाजल्याचा आवाज तासभर घुमत होते. निवडणुकीसाठी तालुक्याच्या १५ गट-गणांतून एकूण एक लाख ५० हजार मतदार १६७ मतदान केंद्रांद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानप्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्ती स्थळी मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २० बसेस आणि २० खासगी जीपमधून हे कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना होतील. तहसील आवारातील सर्व यंत्रणेवर निवडणूक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई (राठोड) व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम लक्ष ठेवून होते. गटासाठी शुभ्र मतदानयंत्र, तर गणासाठी गुलाबी रंगाच्या मतदानयंत्राची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
येवल्यात मतदानाची तयारी पूर्ण
By admin | Published: February 20, 2017 11:19 PM