सातपूर :- शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत.अनेक हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सातपूर मनसेने युवकांची फळी उभी केली असून ' तुम्ही फक्त एक कॉल करा, आम्ही तुमची अडचण सोडवू ' अशी फलकबाजी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाढती रुग्ण संख्याही चिंतेची बाब आहे.अनेक हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावण्याची भीती नातलगांना सतावत आहे.रुग्णास कुठे घेऊन जावे हे देखील नातलगांना ऐनवेळी सुचत नाही. खऱ्या स्थितीपेक्षा अफवा ही अधिक प्रमाणात पसरत असल्याने नेमका निर्णय घेणे देखील अवघड जात आहे. कोरोना रुग्णाच्या बाबतीत नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी मनसेचे नगरसेवक सलीम शेख व योगेश शेवरे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर परिसरात युवकांची एक फळी तयार करून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.कोरोना संदर्भातील हॉस्पिटल मधील बेडच्या सुविधेपासून रुग्णवाहिका व वाढीव बिलासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत संबंधितांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी सातपूर शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले असून संपर्कासाठी युवकांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत.