नाशिक : रम्य सायंकाळ, सादर होत असलेली एकाहून एक सुंदर गीते, त्यांना तितक्याच दमदारपणे मिळत असलेली स्वरसाथ, घुंगरांच्या मंजुळ स्वरांसह भरतनाट्यम्, कथ्थकचे होत असलेले दिमाखदार सादरीकरण या साऱ्या वातावरणाने श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या कला अकादमीतर्फे ‘नृत्य-गीत-बसंत’चे. गुरुवारी (दि.१०) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात दिवंगत ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना समर्पित असलेला हा अनोखा कार्यक्रम पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष बाळासाहेब वाघ, वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य केशव नांदूरकर, संगीतकार धनंजय धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रात हर्षा वडजे, श्रूती बोरसे, हर्षद गोळेसर, आनंद अत्रे, मकरंद नारायण यांनी आपल्या मधुर आवाजात ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘बकुळांची माळफुले’, ‘या जन्मावर, या जगण्यावर’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे’, ‘संतभार पंढरीत’, ‘अबीर गुलाल’, तू सप्तसूर माझे’, ‘स्वरगंगेच्या काठावरती’, जेव्हा तुझ्या बटांना’आदी एकाहून एक सरस गीते सादर केली. त्यांना प्रमोद निफाडे (मृदंग), आनंद अत्रे (हार्मोनियम), सतीश पेंडसे, नितीन पवार, सुजीत काळे, पुष्कर जोशी (तबला), अनिल धुमाळ (किबोर्ड), अभिजित शर्मा (आॅक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. त्यानंतर भरतनाट्यम्द्वारे ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. शिववंदनेनंतर ‘तेजोनिधी’, ‘घेई छंद मकरंद’, ‘नटेश कौतुकम’ आदी गीतांवर भरतनाट्यमद्वारे सुरेख पदन्यास सादर करण्यात आला. यात शिवानी पाठक, प्रतीक्षा झनके, प्रिया दाते, शिल्पा देशमुख हे कलाकार सहभागी झाले होते. त्यानंतर सुमुखी अथनी, रोहित जंजाळे, पंकज ठाकरे, अक्षय शहाणे, भूषण लुंगसे, सागर बोरसे, संतोष अहिरे यांनी आपल्या सुंदर पदलालित्याद्वारे कथ्थक नृत्य सादर केले. गणेशवंदनेने या सत्रास प्रारंभ झाला. त्यानंतर सरस्वतीवंदना, जय जगदीश्वर, झपताल, तराणा मल्हार आदी सादर करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तू सप्तसूर माझे... श्रोते दंग : नृत्य-गायन मैफलीची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:44 AM
नाशिक : रम्य सायंकाळ, सादर होत असलेली एकाहून एक सुंदर गीते, त्यांना तितक्याच दमदारपणे मिळत असलेली स्वरसाथ, घुंगरांच्या मंजुळ स्वरांसह भरतनाट्यम्, कथ्थकचे होत असलेले दिमाखदार सादरीकरण या साऱ्या वातावरणाने श्रोते भारावून गेले होते.
ठळक मुद्देदीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला निमित्त होते कला अकादमीतर्फे ‘नृत्य-गीत-बसंत’चे