नाशिक : स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची मनमानी, नियोजनशून्य कारभार, कामांचा निकृष्ट दर्जा, ट्रायल रनमुळे उडालेला गोंधळ, अशा विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांनी महासभेत संताप व्यक्त केला. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वस्तुस्थिती मान्य करत कंपनीचा कारभार निराशाजनक असल्याचे म्हटले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी हाच मुद्दा उचलून धरत महापौरच हतबल असल्याचा आरोप केला. त्यामुळे दोघांमध्ये सभागृहातच ‘तू - तू, मैं - मैं’ झाली. दरम्यान, या प्रकारामुळे महापौरांनी महासभा पार पडताच अधिकाऱ्यांसमवेत स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करत सूचना केल्या.
नाशिक महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि. १७) महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभीच काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी स्मार्ट सिटीच्या ट्रायल रनमुळे रविवारी कारंजा परिसरात वाहतुकीचा उडालेला बोजवारा आणि व्यावसायिकांच्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असून महापौरांनी पाहणी करण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनीही कंपनीच्या कारभारावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौर स्वत:च हतबल असतील तर सभागृहाने कोणाकडून अपेक्षा ठेवायची, अशा आशयाचा प्रश्न उपस्थित केला. शिवसेनेचे इतर नगरसेवक बाेरस्ते यांच्या मदतीला धावले. त्यामुळे सभागृहातील आवाज वाढला. त्यावर महापौरांनी ‘खाली बसा, मला सर्व कारणे माहीत आहेत, गोंधळ घालू नका’, अशी सूचना केली. त्यामुळे विरोधकांची चांगला संताप झाल्याने खडाजंगी झाली. थोड्याच वेळात वातावरण शांत झाल्यावर उद्धव निमसे यांनीही स्मार्ट सिटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तर कंपनीच्या कारभाराची केंद्र सरकारमार्फत चौकशी करण्याची मागणी अजिंक्य साने यांनी केली. सुधाकर बडगुजर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनुभव नसल्याचा आरोप करत ही कामे दुसऱ्या कंपनीकडून करून घेण्याची मागणी केली.
--------
बोरस्ते म्हणाले...
स्मार्ट सिटीच्या कारभारावर महापौर स्वत:च हतबल असल्याचे दिसून येत आहे. सभागृहात दादागिरी आणि मालकी असल्याप्रमाणेच भाषा केली जात आहे. आम्हाला बोलू दिले जात नसून, हे योग्य नाही.
------------
महापौर म्हणाले...
हतबलता शब्दरचना चुकीची असून सत्यस्थिती मान्य केली आहे. तुम्ही संचालक असताना दोन वर्षे काय केले. उगाच काहीही बोलू नका. खाली बसा, गोंधळ घालू नका. आम्हाला सर्व कारणे समजतात.