नाशिक : म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी लागणारे एम्फोटेरिसिन इंजेक्शन वाटप सुरू असताना रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या तरुणाने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक कृती व मालमत्ता हानी किंवा नुकसान प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, डॉ. संजय माधवराव गांगुर्डे ( ५७, रा. गंगापूररोड) यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्स भागात बुधवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास डॉ. संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली इंजेक्शन वाटप सुरू होते. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे डॉ. संजय गांगुर्डे यांनी कोविड १९ प्रतिबंधक कायद्याचे पालन करण्याबरोबरच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितल्याने त्याचा राग येऊन रांगेतील एका तरुणाने डॉ. गांगुर्डे यांच्यासह कर्मचारी सोनवणे, पाटील व हितेश यांना शिवीगाळ केली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील वरिष्ठांनाही घटनेची माहिती दिल्यानंतर प्राप्त सूचनानुसार डॉ. संजय गांगुर्डे यांनी संबधित तरुणाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.