नाशिक : बहिणीसोबत प्रेमसंबंध स्थापित केल्याचा राग मनात धरून पुर्ववैमनस्यातून एका प्रियकर युवकाला जुन्या नाशकातील डिंगरअळी संभाजी चौक परिसरात धारधार शस्त्राने चौघा हल्लेखोरांच्या टोळी निघृणपणे ठार मारल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी हल्लेखोरांच्या मागावर भद्रकाली पोलिसांची चार पथके रवाना केल्याची माहिती उपआयुक्त अमोल तांबे यांनी दिली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, द्वारका परिसरातील जय जलाराम सोसायटीत राहणारा विवेक सुरेश शिंदे (२३) हा त्याचा मित्र ओम राजेंद्र हादगेसोबत भीशीची रक्कम गोळा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी घराबाहेर पडला होता. रात्री जुने नाशिकमार्गे दुचाकीवरुन घरी परतत असताना या दोघांना संशयित हल्लेखोर सुशांत वाबळे, शंभू जाधव व त्यांच्या अन्य साथीदारांनी अडविले. यावेळी ओम त्यांच्या तावडीतून निसटण्यास यशस्वी ठरला; मात्र सुशांत व शंभू याने विवेकला एकटे गाठून संभाजी चौकातून पुढे मनपा उर्दू शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेऊन धारधार शस्त्राने सपासप पोटावर वार करत पळ काढल्याचे मयत विवेकचा भाऊ रोहनने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजनकुमार सोनवणे हे करीत आहेत. गुन्ह्यातील संशयित आरोपी सुशांत वाबळे, शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव, नाम्या (पुर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यानुसार या संशयित हल्लेखोरांच्या मागावर असलेल्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पध्दतीने शोध घेतला जात आहे. प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून जुन्या भांडणाची कुरापत काढून विवेकला ठार मारल्याचे फिर्यादीवरून दिसत आहे; मात्र जोपर्यंत संशयित हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत खूनाचे मुख्य कारण समोर येणार नाही, असे तांबे म्हणाले. लवकरच सर्व हल्लेखोरांना अटक करण्यास पोलिसांना यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.पंचवटी खूनातील मुख्य संशयितपंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१६ साली टकलेनगर भागात रोहन टाक या युवकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून ठार मारल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातदेखील मुख्य संशयित आरोपी म्हणून सुशांत, शंभू यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. पोलिसांनी त्यांना अटक क रून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना काही महिन्यांनंतर जामीन मंजूर केला होता.